गोंदिया बस अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत

29 Nov 2024 18:15:05
Bus Accident

मुंबई : गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीजवळ शिवशाही एसटी बसला झालेल्या अपघातातील ( Bus Accident ) मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळामार्फत १० लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

मुख्यमंत्री शिंदे यांनी गोंदिया जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या अपघातासंदर्भात माहिती घेतली. अपघातातील सर्व जखमींना त्वरित चांगल्या दर्जाचे उपचार देण्यात यावेत, आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करावे, अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जखमींवर शासकीय खर्चातून मोफत उपचार करण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.
अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी असून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0