गोंदियात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात! आठ प्रवाशांचा मृत्यू

    29-Nov-2024
Total Views |

gondia
 
गोंदिया : (Gondia) गोंदिया जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात होऊन ८ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि गोंदियाच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ २९ नोव्हेंबरला दुपारी १ च्या सुमारास नागपूरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटल्याने ही दुर्घटना घडली आहे. या अपघातात ७-८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच बचावकार्य अद्याप सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
 
देवेंद्र फडणवीसांना व्यक्त केला शोक
 
देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक्सवर पोस्ट करत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडकअर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्‍यांना सांगितले आहे. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, ते मदतकार्यासाठी समन्वय करीत आहेत. या घटनेतील जखमींना लवकर आराम पडावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असं फडणवीसांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
 
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल; परिवहन विभागाला दिले मदतीचे आदेश
 
अपघाताची माहिती मिळताच राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून दुर्घटनेची माहिती घेत जखमींना तातडीने योग्य उपचार मिळवून देण्याच्या सूचना परिवहन विभागाला दिल्या आहेत. त्याचप्रमाणे अपघातातील मृतांना तातडीने १० लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्चदेखील शासन करणार असून मृतांचा आकडा वाढू नये यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत.