ठाण्याची कोंडी फुटणार - गायमुख घाट रस्त्याचे कॉंक्रिटीकरण दृष्टीपथात

    29-Nov-2024
Total Views |
Gaymukh Ghat

ठाणे : घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या दृष्टीने गायमुख घाट ( Gaymukh Ghat ) अत्यंत महत्त्वाचा आहे. घाटातील या कामासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक असून ती डिसेंबर अखेरपर्यंत मिळाल्यास पुढील चार महिन्यात घाट रस्त्याचे कॉक्रिटीकरण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली.दरम्यान, या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने मार्गी लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले असल्याने ठाण्याची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.

घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा, जस्टीस फॉर घोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांच्या बैठकांचा रतीब सप्टेंबर महिन्यापासून सुरू आहेत. गुरूवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक पार पडली.घाट रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा कार्यादेश तयार असून वन विभागाच्या मान्यतेसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. डिसेंबर अखेरपर्यंत ही परवानगी मिळाल्यास जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात घाट रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही देण्यात आली.