‘शिंदेसाहेब बांधतील ते तोरण आणि सांगतील ते धोरण’

सरकारमध्ये सेनेचे नेतृत्व करण्यासाठी आमदारांकडून एकनाथ शिंदेंची मनधरणी

    29-Nov-2024
Total Views |
Eknath Shinde

ठाणे : शिवसेनेचे सर्वाधिकार मुख्यनेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना दिले असून ते जो निर्णय घेतील ती पक्षाची भूमिका, ते बांधतील ते तोरण आणि सांगतील तेच धोरण, असे स्पष्ट करून शिवसेना आमदारांनी आगामी सरकारमध्ये शिवसेनेचे नेतृत्व करावे, अशी मनधरणी शिवसेना आमदारांकडून करण्यात आली.

शिंदे दिल्लीला जाण्याआधी गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सेनेच्या आमदारांनी त्यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. राज्यात महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले काही दिवस मुख्यमंत्रिपदावरून शिंदे समर्थक आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपचे शिर्षस्थ नेतृत्व जो निर्णय घेईल, तो मान्य असेल, अशी भूमिका घेत मुख्यमंत्रिपदाचा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपवला.

याबाबतच्या बैठकीसाठी दिल्लीला निघालेल्या शिंदे यांची भेट त्यांचे आमदार शंभुराज देसाई, आमदार दादा भुसे, आमदार गुलाबराव पाटील, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार संजय राठोड आदींनी घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही सरकारमध्ये या, उपमुख्यमंत्रिपद स्वीकारा, असे आर्जव त्यांनी शिंदे यांना केले. सत्तेबाहेर राहून नव्हे, तर सत्तेत सहभागी होऊन पक्ष चालवा, असा आग्रह नेत्यांनी शिंदे यांच्याकडे धरला.

शिंदे हेच याबाबत निर्णय घेतील

महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी केंद्रात जाण्याच्या वावड्या उठत असल्याने शिवसेनेच्या आमदारांनी शिंदे यांची उपमुख्यमंत्री पदासाठी मनधरणी केल्याचे समजते. याविषयी माध्यमांनी छेडले असता शंभुराज देसाई यांनी, सरकारमध्ये कोण काय होणार? कुणाला काय मिळणार? हे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत. शिंदेच याबाबत निर्णय घेतील, असे स्पष्ट केले.