आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजपची जय्यत तयारी

‘भाजपचे ठाणे’ करण्यासाठी सदस्य वाढविण्याचा संकल्प; ठाण्यात रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्यांच्या विभागवार बैठकांचा धडाका

    29-Nov-2024
Total Views |
BJP

ठाणे : शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची सद्दी असलेल्या ठाणे जिल्ह्यात यापूर्वीही भाजप मोठा भाऊ होता. २०१९ सालच्या तुलनेत भाजपने एक अतिरिक्त जागा जिंकून आताही भारतीय जनता पक्षाने १८ पैकी नऊ जागा जिंकत ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे भाजपचे ( BJP ) ठाणे करण्यासाठी विभागवार पदाधिकार्‍यांच्या बैठकांचा धडाका सुरू झाला आहे.

भाजपकडून जिल्ह्यात ‘सदस्य नोंदणी’ अभियान राबविण्याचे ठरविले आहे. या मोहिमेद्वारे एक प्रकारे भाजपने आगामी पालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांनी वर्चस्व निर्माण करून शिवसेनेची ताकद वाढविली होती. मात्र, गेल्या काही काळात विकासकामांच्या माध्यमातून भाजपने जिल्ह्यात आपला खुंटा मजबूत केला आहे. २०१९ साली झालेल्या निवडणुकीत भाजपने आठ जागांवर विजय मिळविला होता. तर यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात लढलेल्या नऊ पैकी, नऊ जागांवर विजय संपादन करीत भाजप प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्याचबरोबर राज्यातही भाजप अव्वल ठरला आहे.

या पार्श्वभूमीवर ठाणे वर्तकनगर येथील भाजपच्या विभागीय कार्यालयात बुधवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी भाजप नेते माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी नवनिर्वाचित आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकार्‍यांची विभागवार बैठक घेतली. या बैठकीत आमदार संजय केळकर, आ.निरंजन डावखरे, आमदार मंदा म्हात्रे, भाजप प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, विभागीय सचिव हेमंत म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, मनोहर डुंबरे, मिरा-भाईंदर शहराध्यक्ष किशोर शर्मा, सचिन पाटील आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत ठाणे जिल्ह्यात भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे ठरले आहे. रविंद्र चव्हाण यांनी पक्षवाढीसाठी सदस्य नोंदणीच्या कामाला लागण्याचे आदेश पदाधिकार्‍यांना दिले आहेत. या बैठकीत भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कारही करण्यात आला.