मी ८२ जागा निवडून आणल्या, नानांनी त्या १६ वर आणल्या!
अशोक चव्हाण : काँग्रेसने आत्मपरिक्षण करावं
29-Nov-2024
Total Views |
शिर्डी : काँग्रेसमध्ये मी राज्याचा प्रमुख असताना ८२ जागा निवडून आणल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांनी ८२ च्या ४२ जागा केल्या आणि आता नानांनी ४२ वरून १६ वर आणल्या, अशी टीका खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी त्यांनी सहकुटुंब शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
अशोक चव्हाण म्हणाले की, "काँग्रेसने आत्मपरिक्षण करावं. काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. मी राज्याचा प्रमुख असताना ८२ जागा निवडून आल्या होत्या. त्यानंतर पृथ्वीराजबाबा आले, त्यांनी ८२ च्या ४२ जागा केल्या आणि नानांनी ४२ वरून १६ वर आणल्या. असा हा इतिहास आहे. यावर मला काही अधिक सांगायची गरज नाही. त्यामुळे त्यांनी एकंदरीत परिस्थितीचे आकलन त्यांनी केले पाहिजे. मी काही त्यांना सल्ला द्यायला बसलेलो नाही. काँग्रेसमध्ये वरीष्ठ, जाणकार आणि लोकप्रिय माणसे आहेत."
"मलाही भावना आहेत. ज्यापद्धतीने मी १४ वर्षे वनवास भोगला. मला व्यक्तिगत कोणावरही आकस नाही आणि कोणावरही विनाकारण टीका करणे माझा हेतू नाही. शेवटी मी मनुष्य आहे. त्यामुळे मी कदाचित रागाच्या भरात काही बोललो असेल. राजकारणात हार जीत होत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपापले आत्मपरिक्षण करावे," असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.