किगाली : दक्षिण भारतामध्ये विशेषत: बेंगळुरू दहशतवादाला खतपाणी घालणारा कुख्यात दहशतवादी सलमान रेहमान खान याला रवांडामध्ये अटक करण्यात भारताला यश आले आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) सहकार्याने गुरुवारी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी इंटरपोल चॅनेलद्वारे रवांडा येथून दहशतवादाशी संबंधित गुन्ह्यांसाठी लष्कर-ए-तैयबाचा कार्यकर्ता सलमान रहमान खान याचे प्रत्यार्पण करण्यात भारताला यश आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने खानविरुद्ध गुन्हेगारी कट रचणे, दहशतवादी संघटनेचा सदस्य असणे आणि दहशतवादी संघटनेला पाठिंबा देणे आणि शस्त्र कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्याशी संबंधित गुन्ह्यांशी संबंधित गुन्हे दाखल केले आहेत.
कोण आहे सलमान रहमान खान ?
आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सदस्य म्हणून ओळखला जाणारा सलमान रहमान खानच्या विरोधात
२०२३ मध्ये हेब्बल पोलिस स्टेशन, बेंगळुरू येथे दहशतवाद्यांना शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके पुरवल्याच्या गुन्ह्यात एफआयआर नोंदवली गेली होती. सलमान खान, त्याचा सहकारी जुनैद अहमदसह बेंगळुरूच्या तुरूंगातून फरार झाला होता. इंटरपोल नॅशनल सेंट्रल ब्यूरो-किगालीच्या मदतीने सलमान रहमान खानला रवांडामध्ये अटक करण्यात आली व २८ नोव्हेंबर रोजी सुरक्षा पथकाद्वारे त्याचे भारतात यशस्वी प्रत्यार्पन करण्यात आले. या महिन्याच्या सुरुवातीला, बरकत अली खान याचे देखील सौदी अरेबियातून यशस्वीरित्या प्रत्यार्पण करण्यात आले. मुंबईत दंगल आणि स्फोटक पदार्थ वापरण्याच्या गुन्ह्यांमध्ये पोलिस त्याच्या मागावर होते.