चेन्नई : बंगालचा उपसागराच्या दक्षिणेकडे कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे, येत्या काहीच दिवसांमध्ये फेंगल चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. वाऱ्याचा वाढणारा वेग यामुळे मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला जातोय. यामुळे पूरसदृश्य परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता आहे. कराईकल आणि महाबलीपुरम सारख्या भागांमध्ये ३० नोव्हेंबरच्या सकाळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यावर भूस्खलन होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुडुचेरी येथे मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी आपत्ती व्यवस्थापन पथकांची जमवाजमव केली आहे. सखल भागातील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी मदत शिबिरांची स्थापन केली आहे. गेल्या २४ तासांत केंद्रशासित प्रदेशात ७.५ सेमी, तर कराईकलमध्ये ९.५ सेमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. भारतीय तटरक्षक दलाने मासेमारी नौकांना बंदरात परत येण्याचे आवाहन केले आहे. चेन्नईतील प्रादेशिक हवामान केंद्राने कांचीपुरम, चेंगलपट्टू, विल्लुपुरम आणि कुड्डालोरसह अनेक जिल्ह्यांमध्ये "मुसळधार ते अति मुसळधार पाऊस" होण्याची शक्यता वर्तवली आहे. चेन्नई, तिरुवल्लूर आणि इतर भागातही मुसळधार पावसाची अपेक्षा आहे.
चक्रीवादळाचा विमानसेवेवर परिणाम
बंगालच्या उपसागरावरील खोल दाबामुळे तामिळनाडूच्या काही भागांवर मुसळधार पाऊस पडत असल्याने, इंडिगो एअरलाइन्सने बुधवारी प्रवाशांना सूचित केले की चेन्नई, तुतीकोरीन, मदुराई, तिरुचिरापल्ली आणि सेलमला जाणारी विमानसेवा विस्कळीत राहील. भारतीय नौदलाच्या पथकाने देखील या संबंधी तयारी केल्याचे दिसुन आले आहे. भारतीय नौदलाने आपत्कालीन पुरवठ्याची आगाऊ सोय केली असून बाधित समुदायांना मदत करण्यासाठी वैद्यकीय पुरवठ्याचा समावेश आहे.