रियाजात रमणारा अनुराग...

    28-Nov-2024
Total Views |
anurag jagdale


अनुराग जगदाळे हा ग्रामीण मातीतला एक भावपूर्ण आवाजाचा गुणी गायक. धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील निजामपूर-जैताणे या गावातील तरूणाने या क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्याच्याविषयी...

गायनात रियाजाला अनन्यसाधारण महत्त्व, हे त्याने वेळीच ओळखले. त्यामुळे आपले शिक्षण पूर्ण करीत असताना, रियाजावर लक्ष केंद्रीत करून त्याने या क्षेत्रात भरारी घेतली. नावातच संगीतातील ‘राग’ असलेल्या अनुरागची गायकी आज अनेकांना भावली आहे. ग्रामीण भागातील ‘शांतिनिकेतन बालसंस्कार केंद्रा’त पूर्व प्राथमिक, तर ‘आदर्श विद्यामंदिरा’तून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अनुरागने पूर्ण केले. बालपणापासूनच कलेची आवड असल्याने अनुराग अभ्यासापेक्षा इतर सहशालेय सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येच अधिक रमत असे. मोठा भाऊ आशुतोष मात्र अभ्यास, खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांत तरबेज असल्याने मोठ्या भावाकडे पाहून वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षांपासूनच अनुराग धीट होत गेला. अनुरागची आई स्व. रंजना जगदाळे व वडील प्रा. भगवान जगदाळे यांनाही आधीपासूनच साहित्य, संगीत व कलेची आवड असल्याने त्यांनी बालपणीच मुलांचे गुण हेरले व त्यादृष्टीने मार्गदर्शनही केले. दरम्यान, वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच आईच्या अकाली निधनाने अनुराग पुरता कोलमडून गेला. पण, संयुक्त कुटुंब असल्याने वडिलांसह आजी-बाबा, काका-काकू, आत्या, भाऊ आदी कुटुंबीयांच्या भक्कम पाठबळामुळे अनुराग पुन्हा जोमाने उभा राहिला व वयाच्या नवव्या वर्षापासूनच मोठ्या भावासह संगीत शिकायला सुरुवात केली.

पुढे संगीत शिक्षक राकेश खैरनार यांच्याकडे अनुरागने संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. परंतु, ‘अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई’ अंतर्गत शास्त्रीय गायनात प्रवेशिका पूर्ण झाल्यानंतर अनुरागला पुढील संगीत शिक्षणाची समस्या भेडसावत होती. अशातच त्याने वडिलांना सोबत घेत थेट नंदुरबारचा रस्ता गाठला. तेथील ‘सुरसिंगार संगीत विद्यालया’च्या प्रमुखांकडे पुढील संगीत शिक्षण पूर्ण करण्याचा अनुरागने आग्रह धरला. अनुरागची संगीतविषयक तळमळ पाहून, नंदुरबारच्या बालाजी वाड्यातील संगीतप्रेमी रोकडे परिवार त्याला संगीत शिकवायला तयार झाला. संगीत शिक्षिका दिपाली सारंगबुवा रोकडे यांच्याकडे ‘मध्यमा’ पूर्ण पर्यंतचे तर स्व. पं. नलिनी गोविंदबुवा रोकडे यांच्याकडे ‘संगीत विशारद’पर्यंतचे शिक्षण अनुरागने पूर्ण केले. इयत्ता आठवीपासून ते अकरावीपर्यंत अनुरागने शाळा सांभाळून निजामपूर-जैताणे ते नंदुरबार असा प्रवास करून वयाच्या सोळाव्या वर्षी ‘संगीत विशारद’ची पदवी संपादन केली.

दरम्यान, अनुराग विविध स्पर्धांसह युवा महोत्सवांमध्ये व कला महोत्सवांमध्ये सहभागी होत राहिला व तेथेही त्याने जिल्हास्तरावर व विभाग स्तरावर उत्तम यश संपादन केले. ‘कोविड’ नंतर पुन्हा एकदा नव्या दमाने थेट मुंबई गाठली व मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागातून ‘बी. ए. (म्युझिक)’ पर्यंतचा प्रवास पूर्ण केला. तेथे संगीत विभागप्रमुख प्रा. डॉ. कुणाल इंगळे व प्रा. डॉ. चेतना पाठक यांचे अनुरागला मार्गदर्शन लाभले. ‘बी. ए. (संगीत)’ करीत असतानाच अनुरागने नाशिक येथील ‘अथर्व संगीत विद्यालया’चे संचालक ओंकार वैरागकर व पं. शंकर वैरागकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय गायनात ‘संगीत अलंकार’चा प्रवास सुरूच ठेवला. त्यातही तो ‘अलंकार’ प्रथम यशस्वीरित्या उत्तीर्ण झाला. आपल्या आवाजदरम्यान ‘साथ फाऊंडेशन’, ‘तांदूळजा व झक्कास मराठी’ या दोन्ही नामांकित फेसबुक पेजवर आशुतोष आणि अनुराग या दोन्ही भावंडांना फेसबुक लाईव्ह करण्याची संधीदेखील मिळाली. अनुरागच्या संगीत प्रवासाची धुळे आकाशवाणी केंद्रानेही दोनदा दखल घेतली.

मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील व सध्या अमेरिकास्थित असलेल्या मराठी चित्रपट निर्मात्या तथा दिग्दर्शिका प्रगती कोळगे यांनी सोशल मीडियावर अनुरागची गाणी ऐकली. त्याचा भावुक आवाज त्यांच्या पसंतीस उतरल्याने त्यांनी ग्रामीण भागातल्या या गुणी नवोदित कलाकाराला संधी दिली व आपल्या आगामी ’जबराट’ या मराठी चित्रपटासाठी अनुरागच्या आवाजात एक मराठी प्रेमगीतदेखील रेकॉर्ड करून घेतले आहे. प्रख्यात गायिका बेला शेंडे, गायक नंदिश उमप, गायिका वैशाली माडे, आर्या आंबेकर आदी नामांकित गायकांसोबत नवोदित अनुरागलाही या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. आगामी काळात मनोरंजनातून प्रबोधनासाठी अनुरागची धडपड सुरूच राहणार आहे. त्याचबरोबर माता सावित्री, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर आदी महापुरुषांच्या जीवनावर स्फूर्तीगीतांचा अल्बमदेखील काढण्याचा अनुरागचा मानस आहे.

धुळे जिल्ह्यातील ‘मातोश्री सेवाभावी संस्थे’चा अनुराग संचालकदेखील असल्याने त्याला समाजसेवेचीही आवड आहे व भविष्यात शहरी भागातले संगीत हे ग्रामीण भागाकडे नेण्याचा त्याचा मानस आहे. भविष्यात एखादे संगीत विद्यालय अथवा संगीत अकॅडमीदेखील सुरू करण्याचा अनुरागचा मानस आहे. संगीत शिकताना जो त्रास मला झाला, तो इतर गरजू विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून आगामी काळात आयुष्यभर मार्गदर्शकाच्या भूमिकेत वावरणार असल्याचेही तो सांगतो. ‘संगीत क्षेत्र में जो रियाज करेगा, वोही दिलो पर राज करेगा’ अशी अनुरागची धारणा असून, आगामी काळात परमेश्वराने मला रियाज करण्यासाठी बळ द्यावे, अशी प्रार्थना अनुराग ईश्वराकडे करतो. भविष्यात शासनाने संगीतोपचार अर्थात ‘म्युझिक थेरपी’ला मान्यता दिल्यास रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल, असेही अनुरागने सांगितले. त्याच्या या देदीप्यमान वाटचालीस दै. ‘मुंबई तरूण भारत’कडून शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क - 9960010331)

अतुल तांदळीकर