२७ नोव्हेंबर, मुंबई : मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेली आणि लोकांचे प्रचंड प्रेम मिळवणारी भद्रकाली प्रोडक्शन निर्मित ‘वस्त्रहरण’ आणि संगीत देवबाभळी ही दोन नाटके पुन्हा रंगभूमीवर अवतार आहेत. कविता मच्छिंद्र कांबळी यांचा नुकताच ७५ वा वाढदिवस साजरा झाला. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रेक्षकांना रिटर्न गिफ्ट म्हणून या दोन्ही नाटकांचे प्रयोग पुन्हा रंगभूमीवर सुरू केले जाणार आहेत अशी घोषणा समाजमाध्यमांवरुन करण्यात आली.
‘वस्त्रहरण’ या नाटकाचे ५००० हून अधिक प्रयोग झाले, त्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला. तसेच काही सेलिब्रिटी कलाकारांच्या संचात ‘वस्त्रहरण’चे ४४ प्रयोग नुकतेच पार पडले. या प्रयोगांना सुद्धा प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. ‘वस्त्रहण’ नाटकासारखेच भद्रकालीच्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने प्रेक्षकांच्या गर्दीत ५०० हून अधिक प्रयोगांचा टप्पा पार केला. ‘वस्त्रहरण या नाटकाचे प्रयोग तुम्ही बंद करू नका आणि सोबतच ‘संगीत देवबाभळी’ सुद्धा तुम्ही सुरू ठेवा’ अशी विनंती आम्हाला प्रेक्षकांकडून वारंवार केली जात होती म्हणून ही दोन्ही नाटके आम्ही पुन्हा रंगभूमीवर घेऊन येत आहोत अशी प्रतिक्रिया निर्मात्यांनी दिली आहे. ही दोन्ही नाटके पुन्हा एकदा पाहायला मिळणार म्हणून प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.