मुंबई : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल ( Result ) लागला आणि सत्ताचक्रे फिरली. महायुतीला जनतेने आशीर्वाद दिला. तर महाविकास आघाडीकडे राज्यातील जनतेने पाठ फिरवल्याचे चित्र स्पष्ट आहे. जनतेने दिलेला हा निकाल मात्र अद्याप काही विचारवंतांच्या पचनी पडलेला नाही. महायुतीच्या जवळपास प्रत्येक निर्णयाला विरोध करणे, घटक पक्षातील नेत्यांबद्दल अश्लाघ्य भाषेत टीका करण्याचे काम या ‘विचारवंतांनी’ केले आहे. नेमके हे विचारवंत आहेत तरी कोण? हे आपण जाणून घेऊया.
या यादीत असलेले पहिले नाव म्हणजे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे. महायुतीची सत्ता महाराष्ट्रात आल्यापासून जवळपास निखिल वागळे यांनी रोज टीकेची झोड उठवली आहे. येनकेन प्रकारे आरोप करण्याची एकही संधी त्यांनी सोडलेली नाही. सरकारच्या प्रत्येक योजनेची टिंगलटवाळी करणे, हा जणू त्यांचा दिनक्रम असल्याप्रमाणे माध्यमांवर ते व्यक्त होत असतात. महायुतीचा सपशेल पराभव होईल, असे भाकीत त्यांनी निवडणुकांच्या आधी केले होते. निकालानंतर जसे त्यांचे अंदाज चुकले, तसे त्यांनी ‘ईव्हीएम’वर खापर फोडायला सुरूवात केली. हे करत असताना मविआसाठी हा पराभव कसा गरजेचा होता, असे मतसुद्धा त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे आपण नेमके कुणाच्या सर्मथनात आहोत आणि कुणाच्या विरोधात, हेच त्यांच्या ध्यानीमनी नसावे.
पुण्यातील वकील असीम सरोदे हे उबाठा गटाच्या व्यासपीठावर काही काळापूर्वी उपस्थित होते. महायुती त्यातही विशेषतः भाजपला विरोध करण्याचा त्यांचा इतिहास फार जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालादेखील असीम सरोदे यांनी विरोध केला होता. महाराष्ट्रातील सरकारला तीन पायांची शर्यत म्हणून हिणवण्याचे काम ‘निर्भय बनो’च्या सभेतून यांनी केले होते. निवडणुकीच्या दिवशीच निवडणुकीच्या निकालावर दावा करण्यासाठी पूरक असे कुठले साहित्य लागते, याची माहिती त्यांनी समाज माध्यमांवर दिली. यावरून लोकशाहीच्या प्रक्रियेवर असलेला अविश्वासच समोर येतो. महायुतीचा विजय झाल्यावर जनतेचा कौल असलेल्या निकालाला ‘राक्षसी’ बहुमत म्हणत जनतेच्या मतांचा सुद्धा सरोदे यांनी अपमान केला आहे.
विचारवंतांच्या यादीतील तिसरे नाव म्हणजे निरंजन टकले. राहुल गांधी यांच्या यात्रेचे तोंडभरून कौतुक करणारे आणि महायुतीवर शेलक्या शब्दात टीका करणारे निरंजन टकले हे विरोधकांचे खास विचारवंत. सरकारच्या धोरणांच्या अर्थाचा अनर्थ करणारे निरंजन टकले महाविकास आघाडीची तळी उचलून धरत प्रचार करीत होते. समाजमाध्यमांवरील त्यांच्या या टीकेतून न्यायालयसुद्धा सुटलेले नाही. योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत आपल्या संकुचित भूमिकेचे दर्शन त्यांनी जगाला घडवून दिले. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पराभूत झालेल्या उमेदवारांनी व सामाजिक संघटनांनी या निकालाच्या विरोधात काय करायला हवे, याचे मार्गदर्शन करीत आहेत.
विचारवंतांच्या यादीतील चौथे नाव म्हणजे ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निरर्मूलन समिती’चे संस्थापक-संयोजक श्याम मानव. त्यांनी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप करायची मालिकाच सुरू केली होती. राज्याचे गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनी ज्या गोष्टींचा उच्चारदेखील केला नाही, त्या गोष्टी श्याम मानव यांनी जाहीरपणे मांडल्या. त्यांनी केलेल्या विधानांवरून ते सामाजिक कार्यकर्ते कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) प्रवक्तेच अधिक वाटत होते.
मविआच्या विचारवंतांचे मेरूमणीच शोभावे, असे व्यक्तिमत्त्व म्हणजे विश्वंभर चौधरी. हे सरकारच्या विकासकामांना विरोध करण्यापासून ते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर वारंवार टीका करीत असतात. लोकसभेत ‘निर्भय बनो’चा आधार घेत मविआला यश मिळाले होते. परंतु, त्याच महाविकास आघाडीने विधानसभेच्या वेळेस यांच्या ‘निर्भय बनो’कडे ढुंकूनही पाहिले नाही. महायुतीला यश मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील निकाल कसा अनैसर्गिक आहे, असा प्रचाराचा धोषा चौधरी यांनी लावला आहे. त्याचसोबत आता निवडणुका या ‘ईव्हीएम’वर न घेता, मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावा, अशी अजब मागणी केली आहे.