नवी दिल्ली : (Mukul Rohatgi) भारताचे माजी महान्यायवादी आणि नियुक्त वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी अदानी समूहावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांवर स्पष्टीकरण देत हे आरोप निराधार असल्याचा खुलासा केला आहे. यूएस फेडरल करप्शन प्रॅक्टिसेस ॲक्ट अंतर्गत आरोप केल्याची बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
यूएस न्याय विभागाच्या (डीओजे) आरोपपत्रात, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरुद्ध लाचखोरीचा कोणताही आरोप नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुकुल रोहतगी यांनी अमेरिकेच्या न्याय विभागाच्या आरोपांवरील दिशाभूल करणाऱ्या बातम्यांचे खंडन करण्यासाठी माध्यमांशी संवाद साधला.
त्यावेळी मुकुल रोहतगी म्हणाले, "मला जे तुम्हाला सांगायचे आहे ही माझी वैयक्तिक मते आहेत. मी अदानी समूहाचा प्रवक्ता नाही. मी एक वकील असून अनेक प्रकरणांमध्ये अदानी समूहातर्फे न्यायालयात हजर राहिलो आहे. यूएस कोर्टाने दाखल केलेले आरोपपत्र मी पाहिले. त्यात पाच आरोप आहेत. ज्यात पहिला आणि पाचवा आरोप बाकीच्यांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. परंतु पहिल्या आणि पाचव्या आरोपांमध्ये गौतम अदानी किंवा त्यांच्या पुतण्यावर कोणतेही आरोप केलेले नाहीत. यात इतर काही नावांचा उल्लेख आहे. ॲझ्युर पॉवरचे काही अधिकारी आणि एका परदेशी गुंतवणूकदारासह इतर काही जणांवर हे आरोप आहेत. हे आरोपपत्र अतिशय सामान्य असून त्यात कुठलीही स्पष्टता नाही. कोणाला लाच दिली, किती लाच दिली आणि कोणत्या कंत्राटासाठी देण्यात आली अश्या आशयाच्या एकही नावाचा उल्लेख किंवा तपशील आढळत नाही, असे ते म्हणाले.