वारंवार बदलत्या भूमिकांचा फटका मनपातही संख्याबळ घटण्याची शक्यता
27-Nov-2024
Total Views |
नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीला स्वबळावर सामोरे गेलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त होण्याची नामुष्की ओढावली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या घटक पक्षांच्या झंझावातापुढे महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांचा धुव्वा उडाला आहे. मनसेच्या पक्ष मान्यतेबरोबरच कायमस्वरुपी मिळालेले रेल्वे इंजिनही यार्डात जमा करण्याची वेळ राज ठाकरेंवर येण्याची शक्यता आहे.
एकीकडे स्वबळावर लढण्याची तयारी केलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात अवघ्या १२५ ठिकाणी उमेदवार दिले. लोकसभा निवडणुकीतही राज्यात महायुतीला त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आताही जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत उमेदवार देण्याची घोषणा केलेल्या राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष चारच ठिकाणी उमेदवार उभे केले. त्यातही नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात अंकुश पवार यांची उमेदवारी मागे घेतली गेली. परंतु, जनाधार घटल्याने पुन्हा एकदा नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पाटी कोरीच राहिली आहे. त्या अगोदर २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या विरोधात प्रचार करत काँग्रेस राष्ट्रवादीला एका अर्थाने मदत होईल अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली.
प्रत्येक निवडणुकीत विरुद्ध भूमिका घेणार्या मनसेच्या धरसोड वृत्तीमुळे नाशिक जिल्ह्यात असलेला जनाधार कमी होत होत संपुष्टात येऊ लागला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत बसलेल्या फटक्याची झळ आगामी नाशिक महानगरपालिका निवडणुकीतही बसण्याची शक्यता असून येथेही नेहमीप्रमाणे मनसेची पाटी कोरीच राहण्याची शक्यता बळावली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत राज्यात १२५, तर जिल्ह्यात चारच उमेदवारांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले. त्यातील नाशिक पश्चिममध्ये तिसर्या स्थानी राहिलेले दिनकर पाटील यांना ४६ हजार, ६४९ व इगतपुरीत काशिनाथ मेंगाळ यांना २० हजार, ३७४ मते मिळाली. नाशिक पूर्व आणि देवळाली या दोन मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच मनसेचे उमेदवार तळाला राहिल्याचे दिसून आले. देवळालीत तर वंचितच्या उमेदवाराला ११ हजारांहून अधिक मते मिळाली, तर मनसेच्या मोहिनी जाधव यांना अवघी ३ हजार, ९३१ मते मिळाली.
बालेकिल्ला ढासळत गेला
२००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनही मतदारसंघातून मनसेचे उमेदवार विजयी झाले. २०१२ सालच्या मनपा निवडणुकीत पहिल्याच फटक्यात मनपात मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले. राज ठाकरे यांच्या आक्रमक शैलीमुळे नाशिक मनपाच्या सत्तेच्या चाव्या नाशिककरांनी मनसेच्या हवाली केल्या. भाजपचा टेकू घेत राज्यातील पहिला महापौर नाशिकमध्ये बसवण्यात राज ठाकरे यांना यश आले. पुढच्या अडीच वर्षांत भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर नवीन घरोबा करत मनसेचा महापौर पुन्हा खुर्चीत बसला. नाशिकमध्ये सुसाट धावलेल्या मनसेच्या इंजिनाला २०१७ सालच्या महापालिकेत मात्र ब्रेक लागला. या निवडणुकीत मनसेची ४० वरुन पाचवर घसरगुंडी झाली. तर विधानसभेतील तिन्ही जागा मोठ्या फरकाने आपटल्या. त्यानंतर २०१९ साली मनसेने विधानसभेच्या १०१ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी केवळ कल्याण ग्रामीण या एका जागेवर राजू पाटील यांच्या रूपाने एकमेव आमदार निवडून आला. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत १२५ जागा लढवूनही पदरी भोपळाच पडला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीचा बोलबाला?
जिल्ह्यातून काँग्रेस, शरद पवार गट आणि उबाठा गट हद्दपार झाला आहे. त्यापाठोपाठ मनसेच्याही खात्यात गत दोन विधानसभा निवडणुकींपासून भोपळा जमा होत आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चारही पक्षांना ओहोटी लागण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटात याआधीच उबाठा गटाचे १३ नगरसेवक दाखल झाले आहेत. तर काँग्रेस आणि शरद पवार गटाचे नगरसेवकही उडी मारण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ‘स्थानिक स्वराज्य संस्थां’च्या निवडणुकीत महायुतीचा बोलबाला असणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यात मनसेच्या बालेकिल्ल्याला तर २०१९ सालापासूनच भगदाड पडले असून, कितीही जोडण्याचा प्रयत्न केला तरीही गळती सुरुच राहणार असल्याचे नाशिकमध्ये निर्माण झालेल्या चित्रावरुन स्पष्ट झाले आहे.