चिन्मय कृष्णा दास यांच्या अटकेवर बांगलादेशी सरकारला भारताने सुनावले!

    27-Nov-2024
Total Views |
 
iskcon
 
ढाका : (Chinmay Krishna Das) बांग्लादेशातील हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराच्या विरुद्ध लढा देणारे इस्कॉन पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी यांना ढाका येथे देशद्रोहाचा आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. बांग्लादेशमध्ये दास यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले आहेत. अशातच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेवर चिंता व्यक्त केली आहे.
 
हिंदू समुदायाला कायदेशीर संरक्षण आणि अल्पसंख्यांकांसाठी समर्पित मंत्रालयाच्या मागणीसाठी चिन्मय कृष्णा दास यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. यावेळी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आरोप करत चिन्मय कृष्णा दास बांग्लादेशी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर इस्कॉनचे प्रवक्ते राधारमण दास यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि ढाका येथील भारतीय उच्चायुक्तांना या प्रकरणाकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यामुळे आता चिन्मय प्रभूच्या अटकेवर भारत सरकारची भूमिका समोर आली आहे. त्यांना जामीन न मिळाल्याने परराष्ट्र मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे.
 
"बांग्लादेश सम्मिलित सनातन जागरण जोत चे प्रवक्ते चिन्मय कृष्णा दास यांना होणारी अटक व नंतर त्यांचा जामीन नाकारण्यात येणे या सगळ्यांमध्ये आम्ही गांभीर्य़ाने लक्ष घातले आहे. बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अतिरेकी घटकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर ही घटना घडली आहे. तिथे अल्पसंख्याकांची घरे आणि व्यावसायिक संस्थांची जाळपोळ आणि लुटमार तसेच चोरी, देवता आणि मंदिरांची विटंबना असे अनेक गुन्हे दाखल आहेत.
 
परंतु या घटनांचे गुन्हेगार अजूनही मोकाट फिरत आहेत, तर दुसरीकडे, शांततापूर्ण सभांद्वारे आपले हक्क मागणाऱ्या धर्मप्रचारकांवर आरोप केले जात आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. चिन्मय दास यांच्या अटकेविरोधात आम्ही शांततेने विरोध करत आहोत. यासोबतच अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबतही आम्ही चिंता व्यक्त करतो.
 
हिंदू आणि सर्व अल्पसंख्याकांना सुरक्षेची खात्री देण्यासाठी आम्ही बांग्लादेशातील अधिकाऱ्यांना विनंती करतो. यामध्ये त्यांचे शांततापूर्ण आंदोलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही समावेश आहे," असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे."