युनूस सरकारची हिंदू संघटनेविरोधात आगपाखड; बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार!

    27-Nov-2024
Total Views |
bangladesh-terms-iskcon-as-fundamentalist-organisation


नवी दिल्ली :   
  सध्या बांग्लादेशात अराजकता निर्माण व्हावी अशी परिस्थिती दिसून येत आहे. बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस यांनी हिंदूंविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. बांगलादेशच्या युनूस सरकारने उच्च न्यायालयात इस्कॉन या हिंदू संघटनेचे 'मूलतत्त्ववादी' असे वर्णन केले आहे. यावरून बांगलादेशात मोठा वाद निर्माण झाला.

दरम्यान, इस्कॉनवर बंदी घालण्याची कारवाई आधीच सुरू असल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले आहे. इस्कॉनवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका एका मुस्लिम वकिलाने हायकोर्टात दाखल केली आहे. इस्कॉनच्या एका संताच्या अटकेनंतर युनूस सरकारच्या कारवाया समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे युनूस सरकारच्या वकिलाने इस्कॉनला 'रॅडिकल ऑर्गनायझेशन' म्हटले आहे.

बांगलादेशचे ॲटर्नी जनरल असदुझ्झमन यांनी न्यायालयाला सांगितले की, सरकार या 'कट्टरपंथी' संघटनेवर कारवाई करण्याचा विचार करत आहे. त्यावर बंदी घालण्याचे काम सुरू असल्याचे असदुझमान यांनी सांगितले. तसेच, इस्कॉनची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणी वकिलांनी उच्च न्यायालयात इस्कॉनबाबत मीडिया रिपोर्ट्स दिले आहेत.

दरम्यान, इस्कॉन महंत चिन्मय कृष्ण दास यांना दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणांनी अटक केली होती. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांना जामीनही नाकारण्यात आला. यावेळी न्यायाधीश काझी नजरुल इस्लाम यांनी त्यांना प्रथमदर्शनी देशद्रोही सांगत दोषी ठरविले. याप्रकरणी बांगलादेश सरकारकडून इस्कॉनची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

महंत चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर चित्तगाव न्यायालय संकुलात खळबळ उडाली होती. हिंदूंनी येथे निदर्शने करत चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेची मागणी केली. बांगलादेशी पोलीस आणि इस्लामिक कट्टरतावाद्यांनी या हिंदूंवर विटा, दगडफेक आणि लाठीचार्ज केला. यावेळी गोळीबाराची बाबही समोर आली होती.