उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार? स्वबळावर लढण्याचा सूर
27-Nov-2024
Total Views |
मुंबई : विधानसभा निवडणूकीतील पराभवानंतर उबाठा गटाच्या पराभूत आणि विजयी उमेदवारांची मंगळवारी मातोश्रीवर बैठक पार पडली. दरम्यान, या बैठकीत उमेदवारांनी उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्र लढण्याची आग्रही मागणी केली आहे. अंबादास दानवेंनीदेखील या मागणीला दुजोरा दिला आहे.
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी उबाठा गटातील पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी सर्व उमेदवारांकडून पराभवाची कारणे जाणून घेतली. बहुतांश उमेदवारांनी ईव्हीएमबरोबरच मित्रपक्षांवरही नाराजी व्यक्त केली. भविष्यात पक्ष टिकवण्यासाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि हिंदुत्वासाठी स्वतंत्रपणे लढा, अशी मागणी बहुतांश उमेदवारांनी केली. त्यावर मित्र पक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा तो नंतर ठरवू, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत शिवसेनेच्या (उबाठा) ताकदीचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होतो. लोकसभेला काँग्रेस पक्ष पुनरुज्जीवित झाला. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते आपल्याला मिळत नाहीत. त्यांचे कार्यकर्ते आपले काम करीत नाहीत. त्यामुळे हिंदुत्वासाठी स्वतंत्र होऊन निवडणूक लढवावी, अशी मागणी पराभूत उमेदवारांनी उद्धव ठाकरेंकडे केली.
अंबादास दानवेंचा दुजोरा!
'उबाठा' गटातील पराभूत उमेदवारांनी केलेल्या मागणीला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही दुजोरा दिला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले, काही उमेदवारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. हिंदुत्वासाठी वेगळे लढण्याची त्यांची मागणी आहे. शिवसेनेने स्वतंत्रपणे लढायला हवे, असा अनेक लोकांचा सूर आहे. शिवसेनेने महाराष्ट्रातील २८८ विधानसभेत आपली ताकद निर्माण करावी आणि निवडणूका लढवाव्या, अशी भूमिका काही जणांनी व्यक्त केली आहे. आताच्या घडीला आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. मात्र आम्ही महाविकास आघाडीतच राहणार आहोत, असे दानवे म्हणाले.