जलवाहिनी दुरूस्ती कारणाने जी दक्षिण व जी उत्तर विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद!

२२ तासांच्या दुरूस्ती कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे महानगरपालिकेचे आवाहन!

    26-Nov-2024
Total Views |
BMC

मुंबई : लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम गुरूवार दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजेपासून शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा ( water supply ) पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.

लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील गावडे चौकात अस्तित्वात असलेल्या १,४५० मिलीमीटर व्यासाच्या तानसा मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम जल अभियंता विभागाकडून हाती घेण्यात येणार आहे. गुरूवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री १० वाजता हे काम हाती घेण्यात येईल. शुक्रवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ वाजता ते पूर्ण होईल. या अंतर्गत संपूर्ण जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद करावा लागणार आहे. दुरुस्ती कामाच्या प्रत्यक्ष कालावधीत जी दक्षिण व जी उत्तर विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.

या विभागात पाणीपुरवठा बंद :

जी दक्षिण विभाग : करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ, लोअर परळ परिसर, ना. म. जोशी मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - पहाटे ०४.३० ते सकाळी ०७.४५) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी दक्षिण विभाग : ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी ०२.३० ते दुपारी ०३.३०) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी दक्षिण विभाग : संपूर्ण प्रभादेवी परिसर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, आदर्श नगर, जनता वसाहत, अप्पासाहेब मराठे मार्ग, वीर सावरकर मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, गणपतराव कदम मार्ग, प्रभादेवी आणि संपूर्ण लोअर परळ स्थानक परिसर (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी ०३.३० ते सायंकाळी ०७.००) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी ०३.३० ते सायंकाळी ०७.००) पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील.

जी उत्तर विभाग : सेनापती बापट मार्ग, एल. जे. मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, अरूणकुमार वैद्य मार्ग (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - सायंकाळी ०७.०० ते रात्री १०.००) पाणीपुरवठा अंशत: बंद राहील. (३३ टक्के)

कृपया संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच पाणीपुरवठा बंदच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.