जिल्ह्यात उबाठा-काँग्रेसची दाणादाण

26 Nov 2024 13:50:15
UBT

ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ठाणे जिल्ह्यात शिवसेना उबाठा ( UBT ) गटाने नऊ जागा लढवूनही पुरती दाणादाण उडाली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि मनसेचाही जिल्ह्यात सुपडा साफ झाला आहे. भाजप महायुतीने १८ पैकी १६ जागांवर विजय मिळविला. भाजपने नऊ जागा लढवून नऊ जागा पटकावत जिल्ह्यात पुन्हा एकदा भाजपच मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. दरम्यान, या त्सुनामीत महाविकास आघाडीतील शरद पवार गट कळवा-मुंब्रा आणि भिवंडी पूर्वमधून समाजवादी पक्षाला केवळ या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या ठाणे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्येच्या तुलनेत ५६ टक्के पुरुषांनी, तर ५७ टक्के महिलांनी मतदान केले होते. यामुळे पुरुषांच्या तुलनेत लाडक्या बहिणींचा टक्का पुढे होता. लाडक्या बहिणींचे हे वाढलेले मतदानच महायुतीच्या पथ्थ्यावर पडल्याचे दिसत असून या त्सुनामीत उबाठा आणि काँग्रेसचे पुरते पानीपत झाले आहे. २०१९च्या निवडणुकीमध्ये ठाणे जिल्ह्यातील १८ पैकी भाजप आठ, शिवसेना पाच, राष्ट्रवादी दोन, काँग्रेस एक, मनसे एक आणि अपक्ष एक, असे बलाबल होते. राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडून दोनाचे चार पक्ष झाले होते. फुटीनंतर सर्वच्या सर्व पाच आमदार शिंदेंसोबत, तर राष्ट्रवादीच्या दोनपैकी एक आ. शरद पवार यांच्यासोबत, तर दुसरा अजित पवार यांच्यासोबत होता. तरीही लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे दोन आणि शरद पवार गटाचा एक खासदार निवडून आला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही मविआला मोठ्या विजयाची अपेक्षा होती.
जिल्ह्यातील १८ विधानसभांसाठी एकूण २४४ उमेदवार रिंगणात होते. पैकी भाजपने नऊ उमेदवार उभे केले होते. ते सर्व विजयी झाल्याने भाजपचा १०० टक्के ‘स्ट्राईक रेट’ आहे. भाजप तसेच संघ परिवाराने सुनियोजित प्रचार केल्याने हे यश मिळाले आहे. शिवसेनेने सात जागा लढविल्या होत्या. त्यांपैकी सहा जागी यश मिळाले.

उबाठाच्या भविष्यातील राजकारणाला खीळ

उबाठाने नऊ जागा लढवल्या होत्या. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या सभा होऊनही उबाठाच्या वाट्याला पराभवच आला. उद्धव ठाकरे यांनी सभांमधून विकासकामांऐवजी उठसूट भाजप आणि एकनाथ शिंदेचा उद्धार केल्याने जनतेमध्ये एक सुप्त रोष निर्माण झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही तोंडसुख घेतल्याचे परिणाम उबाठाला भोगावे लागले असून एक प्रकारे त्याचेच फळ त्यांना मतदारांनी दिले आहे. उबाठाचे राजन विचारे, सुभाष भोईरसारखे दिग्गज पराभूत झाले. त्यामुळे आता उबाठाच्या भविष्यातील राजकारणाला खीळ बसली आहे. आगामी महापालिका निवडणुकीला कशाप्रकारे सामोरे जातात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Powered By Sangraha 9.0