टीएमटीच्या बसेसद्वारे बाल लैंगिक शोषणाविरुद्ध संदेश
बाल लैंगिक शोषणाविरुद्ध जनजागृती मोहिम
26-Nov-2024
Total Views |
ठाणे : बाल लैंगिक शोषणाविरुद्ध बाल सुरक्षा जनजागृती अंतर्गत “#ProtectedByPOCSO” ही मोहिम राबविण्यात येत आहे. यानिमित्त ठाणे परिवहन (टीएमटी) ( TMT Buses ) विभागाच्या बसेसमध्ये “#ProtectedByPOCSO” हा संदेश असलेले पोस्टर लावण्यात आले.
बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस सातत्याने वाढ होत असल्याने, ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने ’अर्पण’ या बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिबंधासाठी काम करणाऱ्या संस्थेशी सहकार्यासाठी हातमिळवणी केली आहे.महिला व बालविकास विभाग, ठाणे महापालिका, अर्पण सामाजिक संस्था यांच्यावतीने बाल सुरक्षा व अधिकार सप्ताहाच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात #ProtectedByPOCSO या मोहिमेचे संदेश लावण्यात आले. यावेळी संदेश लावण्यात आलेल्या टीएमटीच्या १० बस गाड्यांमध्ये बाह्य जाहिरातींच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. तसेच याव्यक्तिरिक्त सध्या ठाणे शहरात अशा ६०० बसेस धावत आहेत, ज्यांच्या आतमध्ये हे #ProtectedByPOCSO मोहिमेचे संदेश लावण्यात येत आहेत.
टीएमटीच्या बसेस रस्त्यांवर धावत असल्याने हे संदेश सर्वांचे लक्ष वेधून घेतील. तसेच दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात घर करतील आणि त्यातून बाल लैंगिक शोषणकर्त्यांना इशारा मिळेल. यातील प्रत्येक संदेश बाल लैंगिक शोषणाविषयी जागरुक बनवण्याबरोबरच, भारतातील सर्व मुलांचे रक्षण करायला पोक्सो कायदा समर्थ आहे, याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतो आणि शोषणकर्त्यांना बाल लैंगिक शोषणाचा अपराध केल्याबद्दल कठोर शिक्षा होऊ शकते याची त्यांना जाणीव करून देतो.