‘इंडी’ आघाडीस सक्षम नेत्याची गरज

तृणमूल काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शंका

    26-Nov-2024
Total Views |
Kalyan Banerjee

नवी दिल्ली : हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आहे. त्यामुळे आता ‘इंडी’ आघाडीचे ( INDI Allience ) नेतृत्व करण्यासाठी सक्षम नेत्याची गरज आहे, असे सांगून तृणमूल काँग्रेसने राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर शंका व्यक्त केली आहे.
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. दोन्ही राज्यांच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांचा नॅरेटिव्ह सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतर आता काँग्रेसप्रणित ‘इंडी’ आघाडीमधून पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

अपेक्षेप्रमाणे तृणमूल काँग्रेसकडूनच त्याची सुरुवात झाली आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले, हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आले. आम्हाला काँग्रेसकडून चांगली कामगिरी होईल, अशी आशा होती. मात्र, 'इंडी' आघाडीला अपेक्षित परिणाम साधता आले नाहीत. भाजपविरुद्ध लढायचे असेल तर 'भारत' आघाडी मजबूत असली पाहिजे आणि ती मजबूत करण्यासाठी नेत्याची गरज आहे. हा नेता कोण असू शकतो, हा मूळ प्रश्न आहे. काँग्रेसने सर्व प्रयोग करून पाहिले, पण ते अयशस्वी ठरल्याचा टोला बॅनर्जी यांनी लगावला आहे.

बॅनर्जी यांनी यापूर्वी सोमवारीदेखील काँग्रेसला धारेवर धरले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला आव्हान देण्यासाठी एकसंघ नेतृत्वाची गरज त्यांनी व्यक्त केली होती. ममता बॅनर्जींचे नेतृत्व हेच ‘इंडी’ आघाडीसाठी सर्वांत योग्य असल्याचेही त्यांनी म्हटले होते.