ज्ञानसाधना हीच खरी आनंदसाधना!

‘ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालया’त ‘करिअर कट्टा’ सुरू

    26-Nov-2024
Total Views |
Dharmadhikari

ठाणे : “ज्ञानसाधना हीच खरी आनंदसाधना ( Anandasadhana ) असून वाचन हा आपला श्वास असला पाहिजे,” असे प्रतिपादन ‘चाणक्य मंडळा’चे संस्थापक, माजी ज्येष्ठ सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी केले.

‘ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालया’त ‘करिअर कट्टा’ सुरू करण्यात आला आहे. ‘यूपीएससी’, ‘एमपीएससी’सह अनेक स्पर्धापरीक्षांची तयारी कशी करायची, याबाबत तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असून या अनोख्या ‘करिअर कट्ट्या’चे उद्घाटन धर्माधिकारी यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी वाचन, लेखन, निरीक्षण, हजरजबाबीपणा या संदर्भातील अनेक टिप्स त्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या.
‘ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालया’च्यावतीने पुस्तक प्रकाशन, ग्रंथप्रदर्शन, व्याख्यानमाला असे अनेक उपक्रम चालविले जातात. दोनवेळा ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे यशस्वी आयोजनही करण्यात आले आहे. सध्याच्या वैज्ञानिक व तांत्रिक युगात तरुणाई स्पर्धा परीक्षकांकडे वळत असून मुलांना योग्य मार्गदर्शन मिळावे, याकरिता ‘करिअर कट्टा’ सुरू केला असल्याचे ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांनी सांगितले.

सभागृहात स्पर्धा परीक्षकांना उपयोगी पडणार्‍या संदर्भ पुस्तकांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. मुलांना स्पर्धापरीक्षांसंदर्भातील आवश्यक ती १ हजार, ५०० पुस्तके अभ्यासिकेमध्ये तसेच ग्रंथालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याप्रसंगी ठाणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, ‘सी. डी. देशमुख इन्स्टिट्युट फॉर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स’चे संचालक महादेव जगताप, विलास ठुसे, प्रा. संजय चौधरी, उपाध्यक्ष प्रणाली राजे, संदीप भावसार, विद्याधर पटवर्धन, कार्यवाह दुर्गेश आकेरकर आदी उपस्थित होते.

दर दोन महिन्यांनी ‘करिअर कट्टा’

‘ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालया’त दर दोन महिन्यांनी अशा प्रकारचा ‘करिअर कट्टा’ आयोजित केला जाणार आहे. यापुढील ‘करिअर कट्टा’ दि. १९ जानेवारी २०२५ मध्ये होणार आहे. ज्येष्ठ कायदेतज्ञ अ‍ॅड. उज्ज्वल निकम मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.