पश्चिम रेल्वेचा लोकल प्रवास गारेगार होणार

मुंबई उपनगर मार्गावर अतिरिक्त एसी ट्रेन सेवा

    26-Nov-2024
Total Views |

WR



मुंबई, दि.२६ : विशेष प्रतिनिधी 
प्रवाशांमध्ये एसी लोकल गाड्यांची वाढती लोकप्रियता आणि वाढती मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने आज बुधवार, २७ नोव्हेंबरपासून मुंबई उपनगरीय मार्गांवर एसी लोकल सेवेची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार या मार्गावर १३ नवीन एसी सेवा सुरू केल्याने, एसी सेवांची एकूण संख्या आता आठवड्याच्या दिवशी ९६ वरून १०९ आणि शनिवार आणि रविवार ५२ वरून ६५ होईल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एसी लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हितासाठी आणि गर्दीला सामावून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेवर सध्याच्या १२ नॉन-एसी रेल्वेसेवेच्या जागी आणखी १३ एसी सेवा सुरू करण्यात येत आहेत. या सेवा आठवड्यातील सर्व दिवस एसी सेवा म्हणून चालतील. एकूण सेवांच्या संख्येत कोणताही बदल होणार नाही, म्हणजे १०९ एसी लोकल ट्रेन सेवांसह लोकल सेवांची संख्या १४०६ आहे. बुधवार, दि.२७ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या या नवीन एसी लोकल गाड्यांपैकी पहिली चर्चगेट येथून १२:३४ वाजता धावेल आणि त्यानंतर सर्व नवीन एसी लोकल गाड्यांचे नियमित संचालन दिलेल्या वेळापत्रकानुसार असेल.

-----------------------
"पश्चिम रेल्वेवर सुरू करण्यात आलेल्या अतिरिक्त १३ सेवांपैकी ६ सेवा अप मार्गावर आणि ७ सेवा डाऊन मार्गावर आहेत. अप मार्गावर विरार - चर्चगेट आणि भाईंदर - चर्चगेट दरम्यान प्रत्येकी २ सेवा आणि विरार - वांद्रे आणि भाईंदर - अंधेरी दरम्यान प्रत्येकी एक सेवा आहे. त्याचप्रमाणे, डाऊन मार्गावर चर्चगेट - विरार दरम्यान दोन सेवा, चर्चगेट - भाईंदर, अंधेरी - विरार, वांद्रे - भाईंदर, महालक्ष्मी - बोरिवली आणि बोरिवली - भाईंदर दरम्यान प्रत्येकी एक सेवा आहे."

- विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे