सिंधदुर्गातील कातळ सड्यावरुन वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध; कोथिंबिरीच्या कुटुंबातील वनस्पती
26-Nov-2024
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चौकुळ गावातील कातळ सड्यावरून कोथिंबिरीच्या कुटुंबातील वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लागला आहे (sindhudurg new plant species). पावसाळ्यामध्येच उगवणार्या या प्रजातीचे नामकरण ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. श्रीरंग यादव यांच्या नावे ‘टेट्राटेनियम श्रीरंगी’ असे करण्यात आले आहे (sindhudurg new plant species). या प्रजातीच्या शोधामुळे जगात केवळ आंबोली-चौकुळ या जैवसंपन्न प्रदेशामध्येच सापडणार्या प्रजातींची संख्या २३ झाली आहे.
(sindhudurg new plant species)
सह्याद्रीमधील जांभा दगडाचे कातळ सडे हे विविध वनस्पतींच्या विविधतेने संपन्न आहेत. या सड्यांवर उगवणार्या बहुतांश वनस्पती या पावसाळी असून त्या प्रदेशनिष्ठ आहेत. सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गावातील सड्यावरून अशाच एका वनस्पतीचा शोध लावण्यात आला आहे. ‘टेट्राटेनियम श्रीरंगी’ असे नामकरण करण्यात आलेली ही प्रजात ‘बॉलानिकल सर्वे ऑफ इंडिया-पुणे’चे जगदीश दळवी, एच. पी. टी. अॅण्ड आर. वाय. के. महाविद्यालय-नाशिकचे कुमार विनोद गोसावी, केरळच्या देवगिरी महाविद्यालयाचे कांबियेलुमल माधवन मनुदेव आणि त्यांची संशोधक विद्यार्थिनी रेखा छप्नन, ‘होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी’चे अजय गांगुर्डे आणि प्रशांत कान्हीरामपदम या संशोधकांनी शोधली आहे. या शोधाचे वृत्त नुकतेच ‘नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रकाशित झाले आहे.
‘एपियसी’ हे कोथिंबिरीचे कुटुंब असून जगात या कुटुंबामध्ये ३ हजार, ८२० प्रजातींचा समावेश होतो. यांपैकी भारतात २५३ प्रजाती सापडतात. याच कुटुंबांमधील एक कूळ म्हणजे ‘टेट्राटेनियम’. या कुळामध्ये जगात २२ प्रजाती सापडतात. याच कुळामध्ये ‘टेट्राटेनियम श्रीरंगी’ या प्रजातीचा समावेश होतो. संशोधकांना ही प्रजात चौकुळच्या सड्यावर अगदी रस्त्याच्या शेजारीच आढळून आली आहे. ही प्रजात केवळ जांभा दगडाच्या सड्यावरील उंचवट्यावर उगवते. ही वनस्पती ६० सेंमीपर्यंत उंच वाढते. पावसाळ्यात ती रुजते आणि जुलै ते सप्टेंबर महिन्यात तिला बहर येतो. तिच्यावर फुलणारी फुले ही पिवळसर हलकी, हिरवी झाक असणारी असतात. या वनस्पतींच्या पानांमध्ये खूप पर्णिका असतात. पावसाळ्यानंतर ही वनस्पती दिसत नाही. या काळात तिचे मूळखोड (रायझोम) जमिनीखाली असते. पुढच्या पावसाळ्यात ही वनस्पती मूळखोडातून आणि आदल्या हंगामात झालेल्या बीजप्रसारणामधून रुजून येते.
आंबोली-चौकुळचे महत्त्व
सावंतवाडी तालुक्यात ५ हजार, ६१९ हेक्टर क्षेत्रावर आंबोली आणि चौकुळ या गावांचा विस्तार झालेला आहे. या गावांचा परिसर जैवविविधतेचा ‘हॉटस्पॉट’ आहे. एवढ्या छोट्याशा भागामधून २००५ सालापासून २३ नव्या प्रजातींचा शोध लागला आहे. या नव्या प्रजातींमध्ये काही साप, उभयचर, खेकडे, कोळी, विंचू, मासे आणि वनस्पतींच्या प्रजातींचा समावेश आहे.
फळांच्या अभ्यासाची गरज
‘एपियसी’ या कुळातील फळे फार वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्याचप्रमाणे, ‘टेट्राटेनियम श्रीरंगी’ या वनस्पतीची फळेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या फळांचा वापर आपण मसाल्याचा पदार्थ म्हणून करू शकतो का किंवा त्यातून निघणार्या तेलाचा वापर त्वचारोगावर उपचार म्हणून होऊ शकतो का, याविषयी सखोल संशोधन करण्याची गरज आहे. मात्र, ही प्रजाती दुर्मीळ असल्याने या प्रजातीचे जतन करणे भविष्यासाठी गरजेचे आहे. - कुमार विनोद गोसावी, वनस्पती संशोधक