संचिता पाटील-देवल आणि त्यांचे पती आशिष देवल या दाम्पत्याने मिळून सुरू केलेली छोटीशी संस्था म्हणजे ‘मल्लखांब लव्ह.’ खरं तर या नावातच सगळं आलं! मल्लखांब आणि त्यावरचं त्यांचं खूप सारं प्रेम! हेच मल्लखांबासाठीचं प्रेम देवल दाम्पत्याने त्यांच्या जगण्याचं साधन बनवलंय. तेव्हा, या प्रवासाचा प्रारंभ, त्यामागची प्रेरणा, मल्लखांबशी जोडलेली नाळ याविषयी खुद्द संचिता देवल यांनीच शब्दबद्ध केलेला अनुभव...
मराठी माणूस आणि व्यवसाय’ हे गणित जमणार नाही, हे सांगणारे खूपजण भेटले. पण, त्यांना खोट्यात पाडायला आम्ही दोघं होतो. आमच्या दोघांच्याही घरच्यांनी या निर्णयाला साथ दिली. सुरुवातीला ‘बीमा नगर एज्युकेशन सोसायटी’ शाळेमध्ये आमचं पहिलंवहिलं सेंटर सुरू झालं. शाळेने खूप मदत केली. एक मल्लखांब, दहा गाद्या, एक रोप मल्लखांब आणि आम्ही दोघं! तसं पाहिलं तर स्पर्धात्मक मल्लखांबात पुरलेला मल्लखांब, दोरीचा मल्लखांब, टांगता मल्लखांब असे तीन प्रकार असतात. पण, एखादे प्रशिक्षण केंद्र सुरू करायला थोडंफार साहित्य असेल तरी चालतं. सुरुवातीला सोशल मीडियावर क्लासचा प्रचार केला, पत्रके वाटली आणि अॅडमिशनची वाट पाहू लागलो. पाच मुले आणि आम्ही असा क्लास सुरू झाला. त्या पाच मुलांनाही आम्ही प्रेमाने शिकवले. हळूहळू त्या पाच मुलांची 50 मुले कधी झाली, हे कळलेदेखील नाही. एका सेंटरवर थांबणारे आम्ही नव्हतोच. आता ‘मल्लखांब लव्ह’ सुरू करून सात वर्षे झाली. बोरिवलीमध्ये ‘मल्लखांब लव्ह’चे चार सेंटर्स झाले आहेत.
‘सुविद्या प्रसारक संघ’ या बोरिवली, मुंबईमधील नामवंत शिक्षण संस्थेच्या तीन शाळांमध्ये आमचे मल्लखांब प्रशिक्षणवर्ग चालतात. आशिष या शाळेचा माजी विद्यार्थी. या शाळेनेही आम्हाला खूप मदत केली. आतापर्यंत 500 हून जास्त मुलामुलींना आम्ही मल्लखांब प्रशिक्षण दिले आहे. मल्लखांब शिकवणं हे आमचं ‘प्रोेफेशन’ आहे. मल्लखांब शिकवणं हे आम्ही नुसतं काम म्हणून करत नाही, तर हाच आमचा आनंद आहे. समाधान मिळतं आम्हाला त्यातून; एक सर्वांगसुंदर खेळ आम्ही मोठा करत आहोत, याचं समाधान! तसं पाहायला गेलो, तर या खेळाने आम्हाला खूप काही दिलं. मी मल्लखांब राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षिका आहे, तर आशिष 13 वर्षे राष्ट्रीय विजेता असून ‘महाराष्ट्र शासन पुरस्कृत जिल्हा क्रीडा पुरस्कार 2010’, ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, ‘जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत विजेता’ आणि सध्या ‘मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटने’चा मानद कार्यवाह आहे.
असो. सुरुवातीला मल्लखांबावर बसायला घाबरणारी मुलं आणि नंतर मल्लखांब लीलया करणारी तीच मुलं ही प्रगती आम्ही पाहतो आणि त्यांचे पालक आम्हाला भेटून आनंद व्यक्त करतात तेव्हा खूप बरं वाटतं. ‘मल्लखांब लव्ह’मध्ये येणारा प्रत्येक खेळाडू हा आम्हाला आमच्या मुलासारखा आहे आणि आमचे हे खेळाडू जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर खूप चांगली कामगिरी करत आहेत. आमच्याकडे काही विशेष मुलं म्हणजे अंध, मुकबधीर, हायपरअॅक्टिव्ह मुलंदेखील मल्लखांब शिकायला येतात. मल्लखांब करून त्यांच्यात झालेला सकारात्मक बदल आम्ही पाहिला आहे. ‘मल्लखांब लव्ह’चा प्रवास कधी सोपा नव्हता. मल्लखांब शिकवणं आणि संस्था सुरू करणं त्याचबरोबर खेळाचा प्रचार प्रसार करणं, हे सगळं खूप आव्हानात्मक होतं. भांडवल, साहित्य, प्रमोशन, जागा आणि विद्यार्थी या सगळ्या आव्हानांचा सामना करत आम्ही पुढे वाटचाल सुरू केली. देव तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश देतो, हे नक्की. ‘मल्लखांब लव्ह’ची अजून एक बाजू म्हणजे, ‘मल्लखांब लव्ह’ हे जगातील मल्लखांब खेळाचं पहिलं युट्यूब चॅनेल आहे, जिथे तुम्ही मल्लखांब करायला शिकता. युट्यूबवर वेगवेगळे ट्युटोरियल्सचे व्हिडिओ मी पाहत होते, तेव्हा माझ्या डोक्यात आलं, ुहू पेीं मल्लखांब! मग मी अभ्यास सुरू केला. कोणता कॅमेरा वापरायचा, कोणता माईक वापरायचा, छोट्या छोट्या गोष्टी समजून घेतल्या.
व्हिडिओ एडिटिंग करायला पण मी असंच युट्यूब वरून शिकले आणि तिथून सुरू झालं ‘मल्लखांब लव्ह’ युट्यूब चॅनल. आम्ही त्यावर मल्लखांबातील एक एक प्रकार कसा करायचा, त्याचे व्हिडिओ करून टाकायला लागलो. मल्लखांब क्षेत्रात या उपक्रमाचं खूप कौतुक झालं. एकदा मी एका राष्ट्रीय स्पर्धेला गेले होते. तेव्हा अचानक काही मुलेमुली भेटायला आली आणि विचारले की, “आप संचिता पाटील हो ना? ‘मल्लखांब लव्ह’वाले?” मी ‘हो’ म्हटलं. त्यांनी “सेल्फी काढू का?” विचारलं आणि सेल्फी काढलाही! मग त्या मुलांनी सांगितलं की, “आमच्या इथे रोप मल्लखांब शिकवायला महिला प्रशिक्षिका नाही. आम्ही ‘मल्लखांब लव्ह’ पाहून रोप शिकलो आणि आता राष्ट्रीय स्पर्धा खेळायला आलो आहोत.” ही गोष्ट माझ्यासाठी इतकी मोठी होती की कळत-नकळत देशाच्या एका कोपर्यात काही मुलं ‘मल्लखांब लव्ह’ पाहून मल्लखांब शिकत आहेत. असेच एकदा आम्ही एका अनाथाश्रमाला भेट द्यायला गेलो होतो. त्यांच्याकडे मल्लखांब आणि सगळं साहित्य आहे, पण प्रशिक्षक नाही. तिथे मोबाईल नेटवर्कपण येत नाही. तिथले क्रीडाशिक्षक खाली गावात उतरून जातात व तिथे ‘मल्लखांब लव्ह’चे व्हिडिओ पाहून मग परत वर आश्रमात येऊन मुलांना मल्लखांब शिकवतात. मी मल्लखांब जगापर्यंत पोहोचावा, मल्लखांब काय आहे, हे लोकांना कळावे, म्हणून सुरू केलेलं हे चॅनल इतक्याजणांना मदत करेल, असं कधी वाटलंच नव्हतं.
तर अशी आहे ‘मल्लखांब लव्ह’ची कहाणी. ‘मल्लखांब लव्ह’ हे आमच्याकडे येणार्या मुलांबरोबरच त्यांच्या पालकांचं, आमच्या संस्थाचालकांचं सर्व मल्लखांबप्रेमींचं आहे. ‘मल्लखांब लव्ह’च्या अजून खूप शाखा मुंबईत सुरू व्हाव्या, हा प्रयत्न आहे. आमचे गुरू दत्ताराम दुदम सर यांचं स्वप्न होत की, देशात गल्लोगल्ली जसं क्रिकेट खेळलं जातं, तसंच मल्लखांबसुद्धा खेळला जावा. आज आम्ही ते स्वप्न पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत.
संचिता पाटील-देवल
राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक
संचालक - ‘मल्लखांब लव्ह’