'गाढवाचं लगीन' रंगभूमीवर आणणारे शाहीर मधुकर नेराळे यांचं निधन

    26-Nov-2024
Total Views |

मधुकर नेराळे  
 
मुंबई : शाहीर मधुकर नेराळे (वय ८३) यांचे सोमवार २५ नोव्हेंबर रोजी लालबाग येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.
 
तमाशा कलेचे ज्येष्ठ अभ्यासक, गायक, नाट्य निर्माते, लोककला क्षेत्रातील संघटक म्हणून मधुकर नेराळे यांची ख्याती होती. तमाशा कला – कलावंत विकास मंदिर, अ. भा. मराठी शाहिरी परिषद, संगीतबारी थिएटर मालक संघटना, अ. भा. मराठी नाट्य परिषद, पवळा प्रतिष्ठान, शाहीर अमरशेख पुरस्कार समिती अशा वेगवेगळ्या संघटनामध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी पदे भूषविली होती. जसराज थिएटर या स्वतःच्या नाट्य संस्थेमार्फत १९६९ साली मधुकर नेराळे यांनी वगसम्राट दादू इंदुरीकर आणि प्रभा शिवणेकर यांनी गाजविलेले वग गाढवाचं लगीन रंगमंचावर आणले. त्याचे शेकड्यावर प्रयोग केले. गाढवाचं लग्न, आतून कीर्तन वरून तमाशा, राजकरण गेलं चुलीत, उदं ग अंबे उदं, एक नार चार बेजार, पुनवेची रात्र काजळी अशी नाटके लोकनाट्य त्यांनी रंगभूमीवर आणली. महाराष्ट्र शासनाचा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार, प्राचार्य पी. बी. पाटील सोशल फोरम शांती निकेतन पुरस्कार, सांगलीचा कर्मयोगी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. लोककला क्षेत्रात मधुकर नेराळे यांनी खूप मोलाचे योगदान दिले आहे.