पूर्वांचल ते मुंबई रेल्वे प्रवास सोपा होईल

तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांना मंजुरी, ४ वर्षात पूर्ण होणार काम

    26-Nov-2024
Total Views |

railway



मुंबई, दि.२६ : विशेष प्रतिनिधी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि.२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वेबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. हे प्रस्तावित रेल्वे मार्ग पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि अवधचा काही भाग महाराष्ट्राशी जोडतील. या प्रकल्पांची माहितीती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांना दिली.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ३ रेल्वे प्रकल्पांत १६० किमी जळगाव-मनमाड चौथी लाईन, १३ १३१ किमी भुसावळ-खांडवा ३ री आणि ४ थी लाईन आणि ८४ किमीची प्रयागराज (इरादतगंज)-माणिकपूर तिसरी लाईन आहे. प्रस्तावित मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प ऑपरेशन्स सुलभ करेल आणि गर्दी कमी करतील. सुमारे ७,९२७ कोटी रुपये खर्चाच्या तीन प्रकल्पांची तपशीलवार माहिती वैष्णव यांनी दिली. हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "नवीन भारत" च्या संकल्पनेशी सुसंगत आहेत, ज्याचा उद्देश सर्वसमावेशक विकासाद्वारे या प्रदेशाला "आत्मनिर्भर" बनवण्याचा आहे. या प्रकल्पांमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील सात जिल्ह्यांचा समावेश करून नाशिक, जळगाव, बुरहानपूर, खंडवा, रेवा, चित्रकूट आणि प्रयागराज भारतीय रेल्वेचे नेटवर्क सुमारे ६३९ ट्रॅक किमीने वाढवत आहे.

प्रस्तावित मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प

- नाशिक, जळगाव, बुरहानपूर, रेवा, चित्रकूट, खांडवा आणि प्रयागराज या ठिकाणाहून संपर्क वाढवणे.

 - शिर्डी साई मंदिर, शनी शिंगणापूर, पंचवटी, काळाराम मंदिर, गोदावरी गोमुख, वाणी मंदिर आणि घृष्णेश्वर मंदिर या धार्मिक स्थळांना प्रवासाची सुविधा देणे.

- खजुराहो, अजिंठा आणि एलोरा लेणी, तसेच देवगिरी किल्ला, असीरगड किल्ला, रेवा किल्ला, यावल वन्यजीव अभयारण्य, केओटी धबधबा आणि पूर्वा धबधबा यांसारख्या युनोस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये प्रवेश सुधारून पर्यटनाला चालना देणे.

प्रकल्प तपशील

1. मनमाड-जळगाव चौथा मार्ग प्रकल्प

अंतर : १६० किमी

खर्च: २,७७३.२६ कोटी

फायदे : कोळसा, पोलाद, कंटेनर आणि कांदे, फळे आणि सोयाबीनसारख्या कृषी उत्पादनांची वाहतूक सुलभ

2. भुसावळ-खंडवा तिसरा आणि चौथा मार्ग प्रकल्प

अंतर : १३१ किमी

खर्च: ३,५१३.५६ कोटी

फायदे :

मुंबई आणि उत्तर/पूर्व राज्यांमधील प्रवासी सेवा सुधारेल,
भुसावळ जंक्शनची गर्दी कमी होईल.
वार्षिक ४ कोटी लिटर डिझेलची बचत होईल.