टीएमटीचे तिकीट आता घरबसल्या मिळणार

सुट्या पैशांचा वाद मिटणार; लवकरच टीएमटीचे अ‍ॅप होणार सुरू

    25-Nov-2024
Total Views |
TMT

ठाणे : प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे मनपा परिवहन सेवेचे नवीन अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपमुळे प्रवाशांना यूपीआयद्वारे डिजिटल तिकीट काढण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या टीएमटीचे तिकीट ( TMT Ticket ) आता घरी बसून काढता येणार आहे. लवकरच अ‍ॅप सुरू होणार असून त्यामुळे सुट्या पैशांची कटकट मिटणार आहे.

डिजिटल तिकिटांच्या व्यवस्थेमुळे वाहकांची रोख रक्कम हाताळण्याची संख्या कमी होईल आणि सुटे पैसे नसल्याने प्रवासी आणि वाहक यांच्यात होणारे वाद यामुळे टळतील, अशी माहिती ठाणे परिवहन व्यवस्थापन विभागाने दिली.

ठाण्यात टीएमटी परिवहन सेवा प्रवाशांना चांगली मिळावी, यासाठी परिवहन विभागाकडून नेहमीच प्रयत्न केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या ’माझी टीएमटी’ या मोबाईल अ‍ॅपचेही लोकार्पण करण्यात आले. या मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट काढण्याची पद्धत, बसमधील वाहकाकडून केल्या जाणार्‍या व्हेरिफिकेशनचा डेमोही तयार करण्यात आला आहे.

प्रवाशांसाठी ही चांगली सुविधा मिळणार असल्याची माहिती परिवहनच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. सध्या ही सुविधा काही बसमार्गावर सुरू करण्याचे परिवहन विभागाने ठरवले आहे. टप्प्याटप्प्याने टीएमटीच्या सर्व बसमार्गांवर प्रवाशांना अ‍ॅप वापरता येणार आहे.

बसेसची इत्यंभूत माहिती अ‍ॅपवर

मोबाईल अ‍ॅपद्वारे प्रवाशांना यूपीआय वापरून डिजिटल तिकीट काढता येईल. तसेच, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगचा वापर करून पैसे भरता येणार आहेत. प्रवाशांना बस कोठे आणि किती वेळेत स्टॉपवर येणार याची माहिती देण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये आहे. प्रवाशांना अ‍ॅपवर प्रवासाच्या सुरुवातीचे ठिकाण आणि उतरण्याचे ठिकाण यांची माहिती भरून बसमार्ग, त्या मार्गावरील उपलब्ध बसगाड्या, त्यासाठी लागणारे तिकीट भाडे याची माहिती मिळणार आहे.

१४३ बस ताफ्यात दाखल होणार

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून प्रदूषण असलेल्या १२३ इलेक्ट्रिक बस व २० सीएनजी मिनी बस नव्याने परिवहनच्या उपक्रमात दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत परिवहनच्या ताफ्यात ३२९ बस आहेत. आगामी काळात १२३ बसपैकी परिवहनच्या ताफ्यात सध्या ११ बस दाखल झाल्या आहेत. १२३ इलेक्ट्रिक बस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार असून ठाणेकरांना ४७२ बस उपलब्ध होणार आहेत.