पाकिस्तानात यादवी युद्ध ? शिया-सुन्नी संघर्षाला नवीन वळण!

    25-Nov-2024
Total Views |

shia sunni

इसलामाबाद : पाकिस्तान मधल्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात नुकत्याच झालेल्या हिंसाचारात 80 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या राज्यातील कुर्रम भागात हा हिंसाचार झाला. शिया आणि सुन्नी मुस्लिमांच्या जमातींमधील या संघर्षामुळे प्रचंड आर्थिक नुकसानही झाले आहे. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी खैबर पख्तूनख्वामधील कुर्रम जिल्ह्यातील पाराचिनार भागात एका ठिकाणी वाहनांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. हा ताफा राजधानी पेशावर आणि पारचिनार मध्ये ये जा करत होता. अशातच यातील शिया जमातीच्या लोकांवर हल्ला करण्यात आला.

शिया आणि सुन्नी यांच्यातील संघर्षला आता यादवी युद्धाचे वळण आले आहे. माध्यमांना मिळालेल्या महितीनुसार २००७ ते २०११ पर्यंत झालेल्या संघर्षात १६०० पेक्षा अधिक लोकांचा इथे मृत्यू झाला. दुसऱ्या बाजूला जखमी झालेल्या लोकांची संख्या ५००० हून अधिक आहे. या वर्षी नोव्हेंबर मध्ये झालेल्या हलल्याआधी ऑक्टोबर मध्ये अशाच पद्धतीचा हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात शिया-सुन्नी जमातींशिवाय दहशतवादी गटही सामील असल्याचं सांगण्यात येत आहे.

लढाईचे लखनऊ कनेकश्न!
शिया आणि सुन्नी यांच्यातील भांडणाचे मूळ हे १९३० पासून सुरू असलेल्या लढाईत असल्याचे सांगितले जात आहे. १९३० च्या दशकात तत्कालीन अविभाजित भारतात लखनौमध्ये शिया-सुन्नी दंगली झाल्या होत्या. लखनौला शिया-सुन्नी दंगलींचा मोठा इतिहास आहे. या दंगलीदरम्यान शिया मौलानांच्या आवाहनावरून पारचिनार भागातील शिया लोकही लखनौला लढण्यासाठी गेले. त्यांना रोखण्याचे आवाहन येथील सुन्नी मौलानींनी केले होते. या संदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मूळ वाद हा जमीन कुणाच्या मालकीची असेल यावरून सुरू असल्याचे सांगितले जाते. शिया आणि सुन्नी यांच्यातील लढाईचा मुद्दा जमिनीपुरता मर्यादित नसून पाकिस्तानच्या सीमेपल्याड असलेल्या जमातीचा तिचा घनिष्ठ संबंध जोडला गेला आहे. पाकिस्तानमधील बहुतांश लोकसंख्या सुन्नी आहे. ज्या भागात ही लढाई सुरू आहे तो भाग अफगाणिस्तानने तिन्ही बाजूंनी वेढला आहे आणि हे भाग तालिबानसारख्या दहशतवादी संघटनांचे अड्डे आहेत. या दहशतवादी संघटनांमध्ये फक्त सुन्नी दहशतवाद्यांचा समावेश आहे. कुठल्या पंथाचे वर्चस्व भूभागावर राहील यावरून संघर्ष पेटलेला असतो.

२१ नोव्हेंबरपासून सुरू असलेली ही लढाई २४ नोव्हेंबर रोजी ७ दिवसांसाठी शांत झाली. खैबर पख्तुनख्वाचे मुख्य सचिव, कायदा मंत्री आणि पोलिस प्रमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आणि सुन्नी-शिया जमातींशी बोलून तडजोड केली. अर्थात ही तडजोड अजून किती दिवस असेल हे मात्र कुणालाही सांगता येत नाही.