लखनऊ : उत्तर प्रदेशच्या संभळ येथे २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचारात पोलीस खात्यातील २८ जणं जखमी झाली आहेत. मस्जिदीच्या सर्वेसाठी आलेल्या पथकावर स्थानिक कट्टरपंथीयांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला असून २५ आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अशातच आता, या हिंसाचाराच्या बाबतीत काही धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, आता पर्यंत संभळ येथे ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यातच आता पोलिसांच्या तपासात समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे संभळ मधल्या मस्जिीदी लगतच्या घरात हत्यार सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच बरोबर छतावर चढून दगडफेक करणाऱ्या महिलांना सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात एक नव्या पद्धतीचे हत्यार जप्त करण्यात आले आहे ज्याला दोन्ही बाजूंनी धार आहे. एसपी आयपीएस कृष्ण कुमार विश्नोई यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील संभळ तहसील भागात दिवसभर इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. प्रशासकीय परवानगीशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीवर किंवा नेत्याच्या हालचालींवर बंदी घालण्यात आली आहे, तसेच इथल्या शाळा देखील सोमवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.
मुरादाबादचे कमिश्नर आंजनेय सिंह यांनी याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे, माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले " काही कट्टरपंथीयांकडून पोलिसांवर दगडफेकीसह गोळ्या सुद्धा झाडण्यात आल्या आहेत. दगडफेक करणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो की ते काही पुण्याचे काम करत नाही. जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना मी सांगू इच्छितो की त्यांच्या छतावर दगड किंवा ज्वलनशील पदार्थ आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल " रस्त्यावर विखुरलेल्या वस्तू तात्काळ जप्त करण्याच्या सूचनाही पालिकेला देण्यात आली आहे. सबंध प्रकरणात आता पर्यंत ४ जणांवर एफआयआर देखील केली असून, पोलिसांची बाईक जाळणाऱ्या कट्टरपंथींचा शोध सुरू आहे.