ईशान्य भारत ते लडाख : कथाबाह्य चित्रपटांनी वेधले लक्ष

    25-Nov-2024
Total Views |
IFFI

पणजी : “कथाबाह्य चित्रपटांच्या ( Screenplay ) श्रेणीसाठी देशभरातून 250 पेक्षा अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या असून त्यामध्ये ईशान्य भारतातील सहभागींची संख्या लक्षणीय होती,” असे निरीक्षण ‘इंडियन पॅनोरमा विभागा’च्या कथाबाह्य चित्रपट श्रेणीच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष सुब्बिया नल्लामुथू यांनी नोंदवले. गोव्यात 55व्या ‘इफ्फी’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सुब्बिया म्हणाले की, “यामध्ये विविध क्षेत्रांशी संबंधित चित्रपट निर्मात्यांनी भाग घेतला असून यात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि तरुणांचा सहभाग मोठा आहे. निवडीसाठी मुख्यत्वे आशय आणि कथन या पैलूंना प्राधान्य देण्यात आले,” असेही त्यांनी सांगितले.
कथाबाह्य चित्रपटांना प्रकाशझोतात आणण्याची तातडीची गरज आहे, यावर परीक्षक मंडळाने भर दिला. “आपण प्रसारमाध्यमांमध्ये या चित्रपटांबद्दल अधिक बोलले पाहिजे आणि प्रेक्षकांमध्ये तसेच चित्रनिर्मात्यांमध्ये याबद्दल जागृती आणण्यासाठी फिल्म क्लब्स (चित्रपट समूह) निर्माण केले पाहिजेत,” अशी अपेक्षा वंदना कोहली यांनी व्यक्त केली.

क्षितिजावर उगवणार्‍या नव्या प्रघातांविषयी विचार करताना परीक्षक मंडळाने, “ईशान्य भारतातून येणार्‍या सहभागींच्या संख्येतील वाढ आश्वासक आहे,” असे मत नोंदवले. परिणामकारक माहितीपट तयार करण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशात जाणार्‍या शहरी चित्रपट निर्मात्यांच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. “यावर्षी निवड झालेल्या अनेक चित्रपटांमधून अशा अभ्यासाचा कल दिसून आला,” असे त्यांनी नोंदवले. तसेच, “माहितीपटांच्या निर्मितीसाठी अधिक पाठबळाची गरज आहे,” अशा भावना परीक्षा मंडळाने एकमुखाने व्यक्त केल्या. “अशा माहितीपटांसाठी ‘सुयोग्य मंच’ उपलब्ध नसल्याने त्यांना मोठी भरारी घेता येत नाही,” असा विचार त्यांनी मांडला. “कथाबाह्य चित्रपटांच्या प्रकाशन आणि प्रसिद्धीसाठी ओटीटी मंचांनी पुढाकार घेण्याची गरज आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
 
‘इफ्फी 2024’मधील कथाबाह्य चित्रपटांच्या ज्यूरीचे अध्यक्षपद सुब्बैया नल्लमुथू यांनी भूषवले असून त्यांच्या चमुमध्ये रजनीकांत आचार्य, रोनल हाओबम, उषा देशपांडे, वंदना कोहली, मिथुनचंद्र चौधरी, शालिनी शाह या सदस्यांचा समावेश होता.