भारतीय चित्रपटसृष्टीसाठी स्वतंत्र चित्रपटांना प्रोत्साहन देणे आवश्यक : मनोज वाजपेयी

    25-Nov-2024
Total Views |
Manoj Bajpayee

पणजी : “राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज वाजपेयी ( Manoj Bajpayee ) यांनी ५५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभाग घेतला होता. यावेळी, संवाद साधताना त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला भक्कम होण्यासाठी स्वतंत्र चित्रपटांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असून त्यामुळेच जगभरात आपली छाप उमटेल,” असा विश्वास व्यक्त केला.

मनोज वाजपेयी म्हणाले की, “सध्या भारतात हिंदीसह अन्य भाषिक चित्रपट प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहेत. मात्र, पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतंत्र चित्रपटांची लाट येणे फार गरजेचे आहे. कारण, सध्या ‘ओटीटी वाहिनी’वरही जगभरातील विविध प्रकारचे चित्रपट, वेब सिरिज प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या भाषांमध्ये पाहण्याची मुभा आहे. मात्र, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांना जर का उभारी द्यायची असेल आणि इतर भाषिक चित्रपटांच्या शर्यतीत हिंदी चित्रपटसृष्टीला आपली ओळख निर्माण करायची असेल, तर स्वतंत्र चित्रपट पुन्हा निर्मित होणे अत्यंत गरजेचे आहे.”

पुढे ते म्हणाले की, “मधल्या काळात स्वतंत्र चित्रपटांना ओटीटी वाहिनी व्यासपीठ देत होते. मात्र, आता तिथेही तग धरणे कठीण झाले आहे. त्याशिवाय, आजपर्यंत चित्रपटाची खरी परिभाषा ही केवळ स्वतंत्र चित्रपटांची योग्यरित्या अधोरेखित केली आहे. चित्रपट हे जितके मनोरंजनाचे माध्यम आहे, तितकेच ते बाजारीकरणाचेही माध्यम आहे. मात्र, सध्या भारतीय चित्रपटसृष्टीला जगभरात आपली छाप उमटवायची असेल, तर ती संधी केवळ स्वतंत्र चित्रपट तयार करूनच मिळेल.”

एक कलाकार म्हणून संवादाचे महत्त्व तुमच्या लेखी काय आहे आणि संवाद किती महत्त्वाचा वाटतो, यावर आपले मत मांडताना मनोज वाजपेयी म्हणाले की, “लहानपणापासून मला कविता वाचनाची फार आवड होती. त्यातूनच संवादाचे महत्त्व किंवा कोणत्या शब्दांचा, वाक्यांचा कविता वाचनात कसा उच्चार करायचा याची सवय मला लागली होती. मात्र, ज्यावेळी मी दिल्ली विद्यापीठात अभिनयाचे धडे घेण्यास सुरुवात केली, त्यावेळी होणार्‍या तालमींमध्ये मी नाटकाचे संवादही कविता वाचनाच्या पद्धतीनेच करत असल्यामुळे मला नाटकाचे संवाद आणि तिथे संवादांची कशी मांडणी करायची याबद्दल अधिक ज्ञान मिळत गेले. लेखकाने लिहिलेली कथा आणि पात्र म्हणून आपल्या तोंडी दिलेल्या संवादांचे योग्यरित्या सादरीकरण करणे अत्यंत गरजेचे असते, याचा अभ्यास शिक्षकांनी करून घेतला. त्यामुळेच रंगभूमीवरील माझ्या प्रत्येक सादरीकरणातून संवाद फेकीवरची माझी पकड हळूहळू मजबूत होत गेली आणि त्याचा फायदा मला चित्रपटांमधील माझ्या प्रत्येक भूमिका साकारताना झाला. प्रसंगानुरुप कोणत्या वाक्यांवर भर हवा, संवाद म्हणताना भावना त्यातून कशा व्यक्त कराव्या किंवा तोंडी संवाद नसूनही चेहर्‍यावरील हावभाव हादेखील एक संवाद असून तो प्रेक्षकांपर्यंत कसा पोहोचेल, याचा जाणीवपूर्वक सराव करत राहिल्यामुळे माझे प्रत्येक पात्र प्रेक्षकांना आवडले. त्यामुळे आजच्या नवोदित कलाकारांना ‘इफ्फी’ने देऊ केलेल्या या व्यासपीठावरून एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटेल की, आपला अभिनय हा ताकदीचा असला पाहिजेच. पण, तो अधिक दर्जेदार होण्यासाठी संवादांवर पकड फार गरजेची आहे आणि त्याचा अभ्यास हा सातत्याने केलाच पाहिजे.”