चार शक्ती, चार नियम

    25-Nov-2024   
Total Views |
maharashtra assembly election mahayuti key


महायुतीच्या विजयाचे शिल्पकार खर्‍या अर्थाने कोण आहेत, तर ते चार आहेत. 1) सज्जनशक्ती, 2) मातृशक्ती, 3) संतशक्ती आणि 4) संघ स्वयंसेवक शक्ती. या चारही शक्तींचा या निवडणुकीत संगम झाला आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळाले. राज्यकर्त्यांनीदेखील या शक्तीच्या जागरणासाठी त्यांना जमेल तसे प्रयत्न केले. विविध योजना जाहीर केल्या. गोरक्षेपासून ते लाडकी बहीण असे अनेक विषय त्यांनी हाताळले. या चार शक्तींनी ते स्वीकारले आणि विजयाचा वरदहस्त महायुतीच्या मस्तकावर ठेवला.

भारताचे वर्णन अनेक प्रकारे केले जाते. त्यातील एक वाक्य - भारत ही धर्मभूमी आहे. धर्म आणि अधर्म या प्रवृत्ती आणि त्या दोघांचा निरंतर संघर्ष चालू असतो. जिथे धर्म असतो, तिथे विजय असतो. हादेखील आपला सनातन धर्म आहे. धर्म आणि अधर्म प्रवृत्तीच्या संघर्षाचे स्पष्ट दर्शन महाभारतात होते. एका बाजूला दुर्योधन,शकुनी, कर्ण, द्रोणाचार्य, भीष्माचार्य आहेत आणि दुसर्‍या बाजूला योगेश्वर कृष्ण व पांडव आहेत.

दोन्ही पक्ष एकाच वैदिक धर्मातील आहेत. सत्य काय, असत्य काय, न्याय कोणता, अन्याय कोणता, धर्म काय, अधर्म काय हे दोघांनाही उत्तम प्रकारे माहीत आहे. दुर्योधन आणि त्याचा पक्ष घेणार्‍यांची धर्माचा पक्ष घेण्याची प्रवृत्ती नाही, न्यायाने वागण्याची प्रवृत्ती नाही. त्यातील काहीजण सत्तामदामुळे असुरी प्रवृत्तीचे झाले, तर काहीजण सत्तेला शरण गेले आणि लाचार झाले. एक श्रीकृष्ण असा राहिला की, जो सत्तेच्या लालसेपासून तसेच सत्तेच्या मोहापासून पूर्णपणे दूर राहिला.

महाभारत युद्धात कर्तव्य कोणते, अकर्तव्य कोणते, सत्कर्म कोणते, पापकर्म कोणते, धर्म कोणता आणि अधर्म कोणता, हे त्याने गीतेच्या माध्यमातून अर्जुनाला व सर्व समाजाला सांगितले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हे महाभारतीय युद्धच होते. एका बाजूला दुर्योधन सेना व त्यांचे साथीदार आहेत. त्यात कारस्थानी शकुनी कोण, राजगादीच्या मोहाने आंधळा झालेला कोण, अंगी अनेक गुण असूनही सत्तेपुढे लाचार झालेला कोण, या सर्वांची नावे तुम्हाला माहीत आहेत आणि दुसर्‍या बाजूला धर्म म्हणजे न्याय, नीती, सद्विचार, वसुलीबंदी, मातृशक्तीरक्षण, बळीराजाच्या रक्षणासाठी उभे राहिलेले कोण, हेही आपल्या सर्वांना माहीत आहे.

वर दिलेल्या चार शक्ती या योगेश्वर श्रीकृष्णाच्या रुपात उभ्या राहिल्या. खोट्या कथानकांनी संभ्रमात पडलेल्या अर्जुनरुपी जनतेला या शक्तींनी जागे केले. रणांगणात विरुद्ध बाजूला उभे असलेले जरी आपलेच बांधव असले, तरी त्यांना पराभूत करणे का आवश्यक आहे, हे सज्जनशक्तीने, संतशक्तीने, संघ स्वयंसेवक शक्तीने, मातृशक्तीने सर्वांना समजावून सांगितले. जनतेने ते समजून घेतले. खोटी कथानके सांगणार्‍या नेत्यांच्या सभांना त्यांनी गर्दी केली, पण मतदान केंद्रांवर जाऊन धर्मरक्षणार्थ उभे राहिलेल्या आपल्या भावाबहिणींना मत दिले.

जनतेने वर दिलेल्या चार शक्तींचे का ऐकले, हा प्रश्न उरतोच. या चारांपैकी कुणीही जनतेला कोणतेही आश्वासन दिले नाही. अमूक करू, तमूक करू, असे करू, तसे करू असे काहीही सांगितले नाही. त्यांनी जनतेची धर्मशक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला, निर्माण करण्याचा नाही. ती भारतात जन्मलेल्या प्रत्येक भारतीयाला आईच्या उदरात असतानाच प्राप्त होते. प्रत्येक भारतीयाला न्याय कोणता आणि अन्याय कोणता, हे जाणण्याची उपजत शक्ती असते. काही वेळा संभ्रमामुळे ती झाकून राहते, छोट्या-मोठ्या स्वार्थामुळे विस्मरण होते, त्या शक्तीचे जागरण करावे लागते. आपण नवरात्रीत नऊ दिवस उपवासही करतो. परंतु, नवरात्रीतील प्रत्येक रात्र ही धर्मशक्ती जागृत करण्याची रात्र आहे, याचे स्मरण ठेवत नाही. ते काम साधुसंत आणि सज्जनशक्तीला करावे लागते. ते यावेळी त्यांनी केले आणि देशाने लोकशक्तीचा चमत्कार बघितला.

जनतेने या चार शक्तींचे ऐकण्याचे दुसरे कारण असे की, या चार शक्तींपैकी कोणाचाही, कसलाही राजकीय स्वार्थ नव्हता. ते संपूर्णपणे निःस्वार्थ मनाने काम करीत होते आणि जनतेला ते बरोबर समजले. जे संघ स्वयंसेवक मैदानात उतरले, त्यांचा कोणताही स्वार्थ नव्हता. राजकीय लाभाची त्यांची अपेक्षा शून्य होती. जनतेला संघ स्वयंसेवकांविषयी प्रचंड विश्वास आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

या चमत्काराचा धक्का फार प्रचंड आहे. जे पराभूत झाले आहेत, ते काय बोलतात, हे आपण रोज ऐकतच असतो. त्या सर्वांनी एक विचार करायला पाहिजे, तो विचार असा की, दुर्योधनाची भूमिका घेऊन भारतात युद्ध कधीही जिंकता येणार नाही. सत्तासंघर्ष ही सनातन गोष्ट आहे. इतिहासाच्या ज्या कालखंडात राजसत्तेचा उगम झाला, तेव्हाच सत्तासंघर्षाचादेखील उगम झालेला आहे. हा उगम कधीही, कुणालाही संपविता आलेला नाही. महाभारताची नवनवीन रुपांत आवृत्ती होतच राहते. सत्तासंघर्ष धर्मनियमांनी झाला पाहिजे. विश्वासघात, खोटी कथानके, असंगाशी संग हे सर्व अर्धामाचरण या सदरात मोडते. 2019 साली कोणी विश्वासघात केला, कोणी खोटी कथानके रचली, सतत खोटे कोण बोलत राहिले, त्यांना अधर्मी ठरवून जनतेने दूर लोटले आहे आणि याच मार्गाने ते पुढे जाणार असतील, तर त्यांची नियती त्यांना खड्ड्यात घेऊन जाईल.

आजचा आपला लोकशाही धर्म आहे. लोकशाही धर्माचा पहिला नियम असा की, जनतेने ज्यांना बहुमत दिले आहे, ते सत्तेवर येतील. बहुमताचा विश्वासघात करून, असंगाशी संग करून, फसवे बहुमत मिळवून प्राप्त केलेली सत्ता ही दुर्योधनाची सत्ता असते. लोकशाही धर्माचा दुसरा नियम असा की, सर्व सत्तेचा उगम जनता असते. जनतेचा कौल अंतिम मानावा लागतो. त्यावर आक्षेप घेणे म्हणजे लोकशाही धर्माचे उल्लंघन करणे आहे. लोकशाही धर्माचा तिसरा नियम असा की, जनतेने ज्यांच्याकडे सत्ता दिली आहे, त्यांना पाच वर्षे सत्ता राबवू दिली पाहिजे. आणि लोकशाही धर्माचा चौथा नियम असा की, सत्ता राबविताना ती जनहितासाठीच राबविली जाईल, हे पाहण्याचे काम विरोधी बाकावर बसलेल्यांनी करायचे. या चार नियमांना लोकशाही धर्म असे म्हणतात. त्याचे पालन करणे म्हणजे राजकीय धर्माचरण होय. जे पराभूत झाले, ते जर शहाणे झाले आणि या धर्माचे पालन करू लागले, तर त्यांचे कल्याण आहे, अन्यथा.... वाईट कशाला लिहायचे.


9869206101