केशवसृष्टीचे कुटुंबप्रमुख

    25-Nov-2024
Total Views |
Bimal Kediya

मुंबईतील रा. स्व. संघाचे एक कर्तृत्ववान अधिकारी, शिक्षणक्षेत्रात ‘विद्यानिधी’ या नावाने आपला ठसा उमटवणारे आणि ‘केशवसृष्टी’च्या शिक्षणसंस्थेचे प्रारंभीचे मुख्य विश्वस्त श्रीराम मंत्री यांनी २००७ मधील मला लिहिलेल्या एका पत्रामध्ये बिमल केडिया यांचा समर्पक शब्दांत गौरव केला आहे. ते म्हणतात, “केशवसृष्टी’ प्रकल्पास दोन दशके पूर्ण झाली असून, या दुर्लक्षित माळरानाला संघाचा परिसस्पर्श झाल्यानंतर त्यामध्ये जे स्थित्यंतर झाले, ते खरोखरीच नेत्रदीपक आहे. अर्थात, प्रवर्तकांनी आखलेल्या योजनांचे सफल क्रियान्वयन करण्यासाठी बिमल यांच्या रुपाने एक मानवी संगणक लाभला. त्यांनी अनेकांना त्यांच्या रूचीप्रमाणे कामात जोडले. अपार कष्ट घेतले. धीमान, धनवान व जिद्दीचे श्रमवान यांची अजोड जुळणी केली व त्यामुळे आज ‘केशवसृष्टी’चे देखणे रुप दिसत आहे.” बिमलजींचे हे वर्णन सार्थ असून मी गेली २५-३० वर्षे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.
अनेक वर्षे मुंबई महानगराचे कार्यवाह राहिलेले, संघटन क्षेत्रातील आघाडीचे व अनुभवी अधिकारी आणि मुंबईच्या संघ परिवारातील सन्माननीय नाव बिमल केडिया यांच्या अमृत महोत्सवाचा सोहळा परमपूजनीय सरसंघचालकांच्या सान्निध्यात साजरा होत आहे, ही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. बिमल यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणे, या एका छोट्या लेखात अशक्य आहे.

ब्रह्मदेशातून ते भारतात आले, ते संघ संस्कारांचे बाळकडू पिऊनच! मुंबईत या संस्कारबीजांची जोपासना झाली आणि आपला सारासार विचार, प्रांजळपणा आणि योजनाबद्ध परिश्रम या आधारावर ते संघातील अधिकारपदांच्या पायर्‍या चढत गेले. आपला व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेत असताना, त्यांनी दैनंदिन संघकार्याला प्रथम प्राधान्य दिले. ‘अमूक तास व्यवसाय व उर्वरित सर्व वेळ संघकार्य’ हा त्यांनी आपला जीवनसिद्धांत बनवला. अर्थात, गृहस्थी प्रचारक जीवन जगणारे अनेक कार्यकर्ते जिवंत उदाहरण म्हणून त्यांच्यासमोर होतेच. शाखेवरील कार्यक्रम, बैठकांचे नियोजन, योजनापूर्वक केलेले प्रवास, शिबिरे, संघ शिक्षावर्ग यातील त्यांचा सक्रिय सहभाग, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दीसारख्या अनेक भव्य कार्यक्रमांतील प्रमुख भूमिका, या गोष्टी वरिष्ठांच्या ध्यानात येतच होत्या.

म्हणूनच ‘केशवसृष्टी’ प्रकल्पाचे आद्यप्रवर्तक मुकुंदराव पणशीकर यांनी या भव्य प्रकल्पाची धुरा निःशंकपणे बिमल यांच्यावर सोपवली. येथेच त्यांचे नेतृत्व फुलले. त्यांच्याच सांगण्यावरून मी ‘केशवसृष्टी’च्या कामात सहभागी झालो आणि २५ वर्षे त्यांच्या घनिष्ट सहवासाचा आनंद मला मिळाला. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.

बैठक घेण्याची एक खास पद्धत त्यांनी विकसित केली. बैठकीसाठी त्यांनी निवडलेले विषय संख्येने खूप असत. ‘केशवसृष्टी’तील सात संस्था व त्यांचे अनेक विषय, हे त्यांच्या डायरीत एकामागोमाग एक असे शिस्तीने लिहिलेले असत. एरवी दीड-दोन तासांत हे विषय संपणे शक्यच नसते. म्हणून काटेकोरपणाने, फाफटपसारा टाळून, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा, याचा आधीच विचार करून ते एकेका विषयावर ‘टिक मार्क’ करत बैठक घ्यायचे. कार्यवाहच्या यादीत नसतील एवढ्या नोंदी, निरीक्षणे त्यांच्या डायरीत असत.

कार्यात नवी माणसे जोडणे हा तर त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. नवीन कार्यकर्त्याच्या आगमनाने त्यांना खूप आनंद होई. ’एुीींरेीवळपरी’ हा त्यांचा किताब अनेक नव्या कार्यकर्त्यांना मिळे. सर्वांसमोर ते त्यांचे कौतुक करीत. पुढे जर तो कार्यकर्ता नाही टिकला, तर मात्र तो विस्मरणात जाई! बिमल यांनी ‘केशवसृष्टी’च्या प्रत्येक विभागात नवी माणसे जोडली. त्यांच्यावर जबाबदार्‍या टाकल्या व मागे राहून त्यांच्याकडून कामे करून घेतली. ‘केशवसृष्टी’चे माजी अध्यक्ष मुकुंदराव चितळे विनोदाने म्हणत की, “एकदा का बिमलच्या यादीत एखादे नाव समाविष्ट झाले, की त्याची सुटका नाही!!”

संस्थेच्या दैनंदिन कामाच्या धबडग्यात दूरचा विचार करायला सहसा सवडच मिळत नाही. पण, इथे बिमल यांचे वैशिष्ट्य दिसते. २००० सालचे ‘विश्व संघ शिबीर’ याचे उत्कृष्ट उदाहरण. १९९८ सालापासूनच या शिबिराची तयारी सुरू झाली होती. त्यावेळी ‘केशवसृष्टी’त रस्ते, वीज, पाणी, निवास व्यवस्था वगैरे अत्यंत प्राथमिक अवस्थेत होते. शिबिरासाठी तात्पुरती व्यवस्था करण्यापेक्षा, पुढे कायमस्वरूपी उपयोगात येईल, अशी व्यवस्था यानिमित्ताने उभी करण्याचा विचार त्यांनी मांडला आणि प्रयत्नपूर्वक प्रत्यक्षात आणला. त्यासाठी अनेक निमित्ते साधून निधी जमा केला व वसतिगृहाच्या इमारती, पक्के रस्ते, विजेचे खांब, भव्य भोजनालय अशा कायमस्वरूपी सोयी निर्माण झाल्या, ज्या आजही उपयोगात येत आहेत.
 
कार्य पुढे नेण्यासाठी चिंतन बैठकांचे संघाचे वैशिष्ट्य ‘केशवसृष्टी’त आहे. अशा अनेक चिंतन बैठकांचे संचालन मी केलेले आहे. पण, याची तयारी दोन ते तीन महिने आधीपासून बिमल यांच्या कार्यालयामध्ये चालायची. अगदी गीत निवडण्यापासून विषयांची मांडणी, प्रत्येक संस्थेचे प्रतिवृत्त, एखाद्या तज्ज्ञ माणसाचे मार्गदर्शन, उपस्थितीसाठी करावयाचे प्रयत्न, जेवणाचा ‘मेन्यु’ असा सर्वांगीण विचार आम्ही त्यांच्याबरोबर बसून करत असू. यामुळे अशा बैठकांची पद्धत त्यांनी तयार केली व त्यातूनच प्रगतीची पाऊले पडत गेली.

‘केशवसृष्टी’ची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिले मोठे काम त्यांनी हातात घेतले, ते म्हणजे नवीन इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा चालू करण्याचे. भाषेच्या माध्यमावरून खूप चर्चा व वादविवाद झाले. पण, परदेशात, विशेषतः दक्षिण आफ्रिका किंवा आखाती देशातील निवासी भारतीयांना आपल्या मुलांना भारतीय संस्कार मिळण्यासाठी उत्तम दर्जाची निवासी शाळा मुंबईसारख्या महानगरात असावी, असे वाटत होते. तसे निरोप संघाचे परदेशातील काम पाहणार्‍या ज्येष्ठांकडून येत होते. तोच मुद्दा धरून शेवटी इंग्रजी माध्यमावर शिक्कामोर्तब झाले. ओसाड पडलेल्या एका टेकडीवर ही शाळा उभी करण्याचे बिमल व अन्य संचालकांनी ठरवले. निधीबद्दल अगदी शून्यापासून सुरुवात होती. पण, बिमल यांच्या कल्पकतेने नवनवीन संकल्पना राबवून, एकीकडे निधी संकलन व दुसरीकडे इमारतीचे आराखडे, बजेटिंग, परवानग्या, प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. ती दोन - तीन वर्षे बिमल यांना जणू एकच ध्यास होता; शाळा चालू करणे! पण, त्यांनी हे काम जिद्दीने पूर्ण करून घेतले व आज ही संस्था ‘केशवसृष्टी’चे भूषण बनली आहे. गेल्या २८ वर्षांचा या शाळेचा इतिहास म्हणजे शैक्षणिक प्रगतीची गाथा बनली आहे. आजही या संस्थेच्या प्रत्येक घडामोडीवर बिमल यांची प्रेमदृष्टी आहे.

याचठिकाणी ‘सूर्यकुंभ’ हा भव्य कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि त्यामागेही बिमल यांचे नेतृत्व खंबीरपणे उभे होते. जसजसे नवीन विषय समोर येत, त्यात काम करणारे स्वयंसेवक मिळत व त्यांच्या अनुभवाचा उपयोग करीत, काम पुढे सरके. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘सूर्यकुंभ’! या कार्यक्रमात बिमल यांनी ‘केशवसृष्टी’ची संपूर्ण टीम उतरवली आणि ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये या कार्यक्रमाची नोंद झाली.

‘स्वदेशी मेळा’ हाही एक कार्यक्रम बिमल यांच्या नेतृत्वात यशस्वी झाला. या सर्व कार्यक्रमांत आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा कस लागे. पण, खंबीरपणे मागे उभे राहणारे बिमल असल्याने याचे दडपण न वाटता, कार्यपूर्तीचा आनंद मिळत गेला.

जेव्हा ग्रामविकास योजना सुरू झाली, त्यात बिमल अक्षरशः बुडून गेले. एक स्वतंत्र नवी टीम त्यांनी तयार केली. त्यातील ‘रूरल-अर्बन कनेक्ट’, सौरऊर्जा, बांबू उद्योग, स्वयंरोजगार, आदर्श गाव आणि महिला सशक्तीकरण या बाबी निव्वळ अभिमानास्पद आहेत. त्याचे जे परिणाम आहेत, ते थक्क करणारे आहेत.

‘कोविड’मध्ये वनौषधींतर्फे आयुष काढा तयार करून अनेक लोकांना मिळून त्यांना मोठा दिलासा मिळाला, याबाबत बिमल माझे कौतुक करीत. हा काढा सीमेवरील जवानांना पण विनामूल्य पाठवला गेला. पण, ‘कोविड’मध्ये ज्या घरांचे कमावते पुरुष बळी पडले, त्यांच्या कुटुंबीयांसाठी बिमल यांनी जी योजना राबवली, ती म्हणजे माणुसकीचा मोठा अविष्कार होता. हा मनुष्य आतून किती संवेदनशील आहे, याचे दर्शनच यातून घडले.

‘केशवसृष्टी’तील प्रत्येक संस्थेच्या जडणघडणीत बिमल यांचा प्रमुख भाग असला, तरी कोणत्याही संस्थेत चेकवर, पत्रांवर सह्या करण्याचा अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतला नाही. ते सर्व अधिकार आपल्या सहकार्‍यांना दिले. निधी उभा करणे, हे तर बिमल यांचे खास वैशिष्ट्य. पण, एकदा का तो निधी त्या त्या संस्थेच्या हवाली केला, की नंतर ते त्यात लक्ष घालत नाहीत. सहकार्‍यांवर पूर्ण विश्वास, हेच त्यांचे धोरण असे.

जेव्हा बिमल यांनी ‘केशवसृष्टी’च्या कार्याला सुरुवात केली, तेव्हा संस्थेची आर्थिक स्थिती बिकट होती. आज येथील प्रत्येक संस्था आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण असून विश्वासाने विकास योजना हाती घेत आहे. यामागे बिमल यांचे मुख्य प्रयत्न आहेत. स्वतःचा व्यवसायातील अनुभव आणि मारवाडी घराण्याच्या समृद्ध परंपरा, याचा पुरेपूर फायदा त्यांनी संस्थेला मिळवून दिला.
बरोबरीच्या कार्यकर्त्याला मोठेपण देऊन सर्वांसमोर त्याचा सविस्तर परिचय करून देणे, हेही ते अगदी सहजपणे करतात. सर्वांशी ते सहज संवाद साधतात. मग तो ड्रायव्हर अशोक असो, बागकाम करणारा अश्विनी असो, की ‘एस्सेल वर्ल्ड’चे गोयल किंवा ‘एक्सेल’चे श्रॉफ असोत.

कोण कुठे राहतो, काय करतो, काही अडचण आहे का? याची माहिती ते सहज बोलता बोलता घेतात आणि आपल्यापरीने त्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करतात, तेही कोणतीही वाच्यता न करता! कोणाकडेही मंगलकार्य असो किंवा एखादी दुःखद घटना असो, बिमल वेळ काढून जाणारच! अनेकांना व्यवसायात त्यांनी मदतीचा हात दिला. यामध्ये माझाही समावेश आहे. हे सर्व शांतपणे करण्यासाठी जी मानसिक शांतता लागते, ती त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवली आहे. विपश्यनेची साधना करून त्यांनी त्यांची ही क्षमता सिद्ध केली आहे.

एवढे करून त्यांचे स्वतःच्या कुटुंबाकडेही लक्ष असते. एकत्र कुटुंब पद्धतीचे त्यांचे संस्कार सहज लक्षात येतात. माझे त्यांचे संबंध जुने आहेत. तेव्हा ते मला ‘अरे-तुरे’ म्हणायचे. पण, मी जेव्हा ‘केशवसृष्टी’चा कार्यवाह झालो, तेव्हा त्यांनी मला ‘अहो-जाहो’ करायला सुरुवात केली व त्याचे समर्थनही केले. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांवर त्यांचा नैतिक अधिकार आहे व त्या अधिकाराने ते कोणतेही काम सांगू शकतात व लोकं ते आपुलकीने करतातही. ‘केशवसृष्टी’चा इतिहास किंवा संघाचा परिचय सांगायला ते बोलावतात आणि मी ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी पोहोचतो, हाच त्यांच्या अधिकाराचा उपयोग!
असे आपले बिमल... ते समोर असले की सारे वातावरण आत्मविश्वासाने भरून जाते. त्यांची साधी-सरळ जीवनशैली, गुणग्राही स्वभाव, संवेदनशील मन आणि नियमितता याचे लोभस दर्शन त्यांच्या प्रत्येक भेटीत होते आणि आज त्यांचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. अशावेळी ‘जीवेत् शरदः शतम्’ हेच उद्गार सर्वांच्या मनातून उमटत आहेत.

त्यांना सविनय नमस्कार.

सतीश सिन्नरकर

(लेखक ‘महानगरी वार्ताहर’चे संपादक आणि ‘वंदे मातरम् फाऊंडेशन’चे अध्यक्ष आहेत.)