महाराष्ट्र, झारखंड मतमोजणीची एलॉन मस्क यांच्याकडून दखल

कॅलिफोर्नियामधील निवडणूक निकाल प्रलंबित; भारत आणि अमेरिकेची तुलना

    25-Nov-2024
Total Views |
Elon Musk

वॉशिंग्टन : भारतात झारखंड आणि महाराष्ट्र विधानसभेसाठीची मतमोजणी शनिवार, दि. २४ नोव्हेंबर रोजी पार पडली. यासाठीचे झारखंडमध्ये दोन टप्प्यांत, तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक मतदानप्रक्रिया पार पडली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनंतर मतमोजणी करण्यात आली. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी महाराष्ट्र, झारखंड मतमोजणीची दखल घेतली. या संदर्भात त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे.

एलॉन मस्क यांनी भारतातील मतमोजणीवर ‘एक्स’ पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “भारताने एका दिवसात ६४ कोटी (६४० दशलक्ष) मतांची मोजणी केली, पण कॅलिफोर्नियाची निवडणूक होऊन १९ दिवस झाले, तरी निकाल अद्याप प्रलंबित आहे,” असे त्यांनी म्हटले आहे. मतदानाच्या १९ दिवसांनंतरही कॅलिफोर्नियाने अधिकृतपणे अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल जाहीर केले नाहीत. त्यामुळे एलॉन मस्क यांनी या प्रक्रियेवर जोरदार टीका केली. तसेच, लोकसभा निवडणुकीदरम्यान भारताने यशस्वीरित्या पार पाडलेल्या प्रचंड मतदानप्रक्रियेची तुलना केली. मस्क यांनी निदर्शनास आणून दिले की, “भारताने केवळ एका दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी केली, तर यूएस राज्यात अजूनही मतमोजणी सुरू आहे.”

अद्याप अमेरिकेतील निवडणुका मतमोजणी अपूर्ण

अमेरिकेत दि. ५ नोव्हेंबर रोजी निवडणुका पार पडल्या. निवडणूक होऊन १८ दिवस झाले. मात्र, कॅलिफोर्नियामध्ये अजूनही दोन लाखांहून अधिक मतांची मोजणी सुरू आहे. अमेरिकेच्या निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प विजयी घोषित झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाला ३१२ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. बहुमतासाठी केवळ २७० इलेक्टोरल मतांची गरज होती. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना २६६ इलेक्टोरल मते मिळाली. जो बायडन सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. दि. २० जानेवारी रोजी कॅपिटल हिलवर डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणूंन शपथविधी होणार आहे.

एका दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी

भारतातील मतमोजणीबद्दलची पोस्ट रिट्विट करताना मस्क यांनी लिहिले, “भारताने एका दिवसात ६४ कोटी मतांची मोजणी केली. कॅलिफोर्निया अजूनही मतांची मोजणी करत आहे. या मतांची संख्या जवळपास दोन लाखांपर्यंत आहे,” असेही मस्क यांनी ‘इमोजी’च्या माध्यमातून या पोस्टमध्ये सांगितले आहे.