लाडक्या बहिणींची माया! वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींकडून एकनाथ शिंदेंचे औक्षण

    25-Nov-2024
Total Views |

shinde
 
मुंबई : (Eknath Shinde) राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला कौल दिल्याने महायुतीने राज्यात अविश्वसनीय मतांचा आकडा ओलांडला आहे. या अभूतपूर्व यशासाठी कारणीभूत असलेल्या कारणांपैकी एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना होय. खरंतर या योजनेतील लाभार्थी ठरलेल्या लाडक्या बहिणींनी महायुतीला मतांच्या रुपात भरभरून दिलेले आशीर्वाद फळले. महायुतीच्या या ऐतिहासिक विजयानंतर लाडक्या बहिणींकडून वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदेंचे औक्षण करुन विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदेंनी महिलंना दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले.
 
दरम्यान यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, "लाडक्या बहिणीने इतिहास घडवला आहे. अडीच वर्षात आपण खूप काम केलं आहे . कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना ही सुपरहिट झाली. बहिण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी…", असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
 
"लाडक्या बहिणींमुळे एक अद्भुत विजय आपल्याला मिळाला.विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता राहिला नाही इतकं आपण त्यांना धुवून टाकलं. तुम्ही महायुतीला जी भक्कम साथ दिली त्याबद्दल तुम्हा सगळ्या बहिणींचे मनापासून आभार. तुम्ही आज अभिनंदन करायला आलात पण मी एवढेच सांगतो . तुमच्या पाठीशी हा भाऊ कायम खंबीरपणे उभा राहील याची खात्री बाळगा", असे याप्रसंगी नम्रपणे नमूद केले.
 
दीड हजार रुपयांप्रमाणे आता आपण दोन हजार रुपये करणार!
 
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, मी विचार केला की आमच्या लाडक्या बहिणीच्या कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे. म्हणून ही योजना सुरू केली. हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे मग सर्वसामान्य लोकांच्या घराला हातभार लागला पाहिजे. २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर मोदीजींनी काढलं .आपल्या राज्यात सुद्धा कोणीही उपाशी झोपता कामा नये . दीड हजार रुपये प्रमाणे आता आपण २,००० रुपये करणार आहे. हे सरकार तुमचं आहे म्हणूनच हे सरकार तुम्ही पुन्हा आणलं आहे.