भ्रमाचा भोपळा फुटला

    25-Nov-2024
Total Views |

mva
 
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल लागले आहेत. महायुतीच्या पारड्यात जनतेने भरभरून मतांचे दान टाकले आहे. पाच वर्षांपूर्वी दगाफटका करुन जनतेच्या आदेशाचा ज्यांनी अपमान केला होता, त्यांना खर्‍या अर्थाने आज जनताजनार्दनाने न्याय मिळवून दिला. मात्र, पराभवाबाबत चिंतन करून, त्यातून काही बोध घ्यावा इतकेही शहाणपण विरोधकांकडे उरलेले दिसत नाही. सातत्याने आम्ही म्हणजे असामान्य नेतृत्व अशी शेखी मिरवण्यात विरोधी पक्षातील नेत्यांची हयात गेल्याने, त्यांच्याकडे बाप पुण्याई वगळता आप पुण्याईची वानवाच. त्यामुळेच झालेल्या दारूण पराभावाबाबत आत्मचिंतन करावे या विचाराने विरोधी पक्षातील नेत्यांच्या मनाला स्पर्शदेखील केला आहे, असे सध्या तरी वाटत नाही. याउलट माध्यमांमध्ये चमकण्यासाठी उथळ विधाने करण्याची चढाओढच मविआच्या नेत्यांमध्ये दिसून येते आहे. मविआच्या नेत्यांनी यावेळीही ईव्हीएमला दोष दिला आहेच. तसेच भाजपला एवढ्या जागा मिळतातच कशा? असा प्रश्न काँग्रेसचे पवन खेरा यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कहर करत, माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना या पराभवाचे कारक मानले आहे. महायुतीच्या विजयाच्या अशा एक ना अनेक थेअरी तयार करण्यात मविआचे नेते एकमेकांशी स्पर्धा करण्यात गुंतले आहेत. वास्तविक पाहता फुटलेला भ्रमाचा भोपळा त्यांना सहन होत नाही आहे.
 
जनता काय विचार करते? तिचे सुख कशात आहे? या सगळ्यापासून मविआचे नेते कोसो दूर आहेत. माझ्या पक्षात माझे स्थान कसे अबाधित राहील आणि ते अधिक कसे वाढेल, यासाठीच पराभावाने खट्टू झालेले पक्षप्रमुखांचे मन रिझवण्याचा एककलमी कार्यक्रमच मविआचे नेते राबवताना दिसत आहे. त्यात असीम सरोदेसारखे मविआचे हितचिंतक तुम्ही हरुच शकत नाही, न्यायालयात प्रत्येक उमेदवाराने स्वतंत्र याचिका करण्याची शक्कल मविआला शिकवत आहेत. यामध्ये सरोदे यांचा स्वार्थच अधिक दिसतो आहे. मात्र, सरोदे यांच्यासारख्या लोकांमुळे आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला अशीच मविआची अवस्था होणार आहे हे नक्की. पण, याकडे डोळसपणे बघायला कोणाकडे वेळच नाही, जो तो व्यस्त आहे त्याची पोळी भाजण्यात आणि कोणाला चुकून उपरती झालीच तर, मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण? हा प्रश्न वेगळाच!
 
 
अज्ञातांची उठाठेव
 
 
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची चाहूल लागलीच होती. आता या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात रालोआ सरकार अनेक प्रलंबित विधेयके पारित करून, देशाला दिलेल्या सुधारणेच्या वचनांचा पुढवा अध्याय सुरुवात करणार याचे आखाडेदेखील सर्वत्र बांधले जाऊ लागले होते. ‘एक देश, एक निवडणूक’ हे विधेयक सरकार आणणार की, ‘वक्फ बोर्डा’विषयीचे विधेयक अधिवेशनात येणार यावर जनसामान्यांमध्ये मंथन सुरु झाले होते. भरीला जनसंख्या नियंत्रणापासून अनेक विधेयके होतीच. यात सगळ्यात विरोध कशावर करु हे शोधत विरोधक मात्र गलीतगात्र झाल्यासारखे बसले होते. मात्र, या विरोधकांचे अज्ञात कैवारी धावून आले. त्यांनी ऐनवेळी अदानी समूहाचा मुद्दा नेहमीप्रमाणे विरोधकांना बक्षीस म्हणून दिला. तसेच, बरोबर अधिवेशनाच्या वेळीच पुन्हा मणिपूर पेटवण्यात आले. आता याच मुद्यांवर संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे. अर्थाताच सरकार त्यावर त्यांची भूमिका मांडेलही. मात्र, अदानी समूहावरचे आरोप ज्या राज्यांमध्ये झाले आहेत, ती राज्ये विरोधकांच्या सरकारकडेच आहेत. असे असताना तिथे चर्चा घडवण्याचे धाडस काँग्रेस करेल का? हा प्रश्न आहे.
 
मात्र, या प्रश्नापेक्षा महत्त्वाची आहे ती हा विषय चर्चेला आला ती वेळ. असे काय साटेलोटे इथल्या विरोधकांचे परकीय शक्तींशी आहे की, ते अधिवेशनाच्यावेळीच विरोधकांना बारुद पुरवत असतात. यावरही सविस्तर चर्चा आणि त्याचबरोबर तपासणीदेखील गरजेची झाली आहे. कारण, गेली पाच ते सहा अधिवेशने हाच प्रकार होत आहे. त्यामुळे जर इथल्या कोणाचेही कोणत्याही प्रकारचे हितसंबंध परकीय शक्तींच्यासमोर गुलाम होऊन लाळघोटेपणा करत असतील, तर ती व्यक्ती या देशाचा विश्वासघात करत आहे हे निश्चित. चुकूनही ती व्यक्ती खासदार असेल, तर त्यामुळे त्या व्यक्तीने घेतलेल्या संविधानाचादेखील अपमानच करत आहे. अशी व्यक्ती संसदेत बसणे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय घातकच. त्यामुळे या सगळ्या घटनांकडे देशाच्या जनतेनेदेखील जागरुकपणे बघणे गरजेचे आहे. येत्या अधिवेशनामध्ये रालोआ सरकारने या अधिवेशनात ‘वक्फ बोर्डा’चे विधेयक आणण्याची पूर्ण केली आहे. त्यामुळे हे अधिवेशन काँग्रेस स्वत:चे हट्ट पुरवण्याचा आग्रह धरत अधिवेशन वाया घालवते की, अधिवेशन सफळ पूर्ण होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कौस्तुभ वीरकर