योजक: तत्र दुर्लभः।

    25-Nov-2024
Total Views |
Bimal Kediya

बिमलजींचा महानगरात योजनाबद्ध नियमित प्रवास सुरु झाला. दर महिन्यात महानगर बैठक होत असे. एखादी बैठक बिमलजींच्या घरीसुद्धा होत असे. त्यामुळे एका गृहस्थी कार्यकर्त्याचा परिचय होऊ लागला. कार्यकर्त्याने आपली दिनचर्या ठरवावी. त्यातून परिवारासाठी, नोकरी-व्यवसायासाठी आणि संघकामासाठी किती वेळ देता येईल, याचे नीट नियोजन करावे. आपल्या जबाबदारीचे महत्त्व आणि कार्यक्षेत्राचा विस्तार ध्यानात घेऊन वेळेचे नियोजन कसे करावे, हे बिमलजींकडून शिकावे. प्रत्येक बैठकीतून बिमलजींच्या कार्यकौशल्याच्या एका-एका पैलूचे दर्शन घडू लागले. बैठक वेळेवर सुरु होऊन वेळेवर संपावी, असा बिमलजींचा आग्रह असतो. बैठकीत घ्यायच्या विषयांची क्रमाने नोंद करावी. ‘झालेच पाहिजेत’ असे महत्त्वाचे विषय कोणते? वेळेअभावी एक-दोन विषय पुढे ढकलले, तर चालेल असे विषय कोणते? अशाप्रकारे ‘होम वर्क’ करुनच बैठकीत येण्याचा त्यांचा स्वभाव. बैठकच नव्हे, तर कोणताही छोटा-मोठा कार्यक्रम किंवा प्रवास असो, बिमलजींनी नीट नियोजन केलेले असते. त्यामुळे त्यांनी ठरविलेले सर्व कार्यक्रम यशस्वी होत असतात.

नियोजनात ते ‘मास्टर’ आहेत. ‘योजक: तत्र दुर्लभः।’ बैठकीमध्ये एखादा कार्यकर्ता विषय सोडून दुसर्‍याच विषयावर बोलायला लागला, तर सहजपणे गाडी परत रुळावर आणण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत आहे. बैठकीत कोणत्याही प्रकारची कटूता न येता वातावरण अगदी हलके-फुलके ठेवण्याचे त्यांचे कौशल्य तर दाद द्यावे असे. अशाप्रकारे बिमलजींची ओळख प्रत्येक कार्यक्रमातून वाढत होती. बिमलजींचेही माझ्याकडे लक्ष आहे, हे जाणवत असे. पण, अगदी मित्रत्वापर्यंत हे नाते जात नव्हते. पण, त्यांच्याबद्दलचा आदर मात्र वाढत होता.

अर्थात, मित्रत्व निर्माण होण्यासाठी काहीतरी साम्य असावे लागते. बिमलजी उच्च विद्याविभूषित, उद्योजक, सुखवस्तू घरात वाढलेले, मी एक मॅट्रिक्युलेट कामगार. भांडूपच्या चाळीतील 108 या खोलीत राहाणारा एक सामान्य स्वयंसेवक. बिमलजी एक कर्तृत्ववान - कल्पक अधिकारी! त्यामुळे बिमलजींशी कितीही जवळीक असली, तरी ती जवळीक मैत्रीपर्यंत जाऊ शकत नव्हती. कारण, त्यांच्याबद्धल वाटणारा आदर हा एक पातळ पडद्यामध्ये उभा होता. मला वाटते, हे बिमलजींच्याही लक्षात आले असावे, म्हणून ते साम्यस्थळे शोधत असत. भांडूपला बिमलजींचा नियोजित प्रवास सुरु होता. शेवटी माझ्या घरी आले. मी विभाग सहकार्यवाह ही जबाबदारी घ्यावी, असा त्यांचा प्रयत्न सुरु होता. घरून निघताना मला आपल्याबरोबर त्यांच्या घरी घेऊन गेले. माझ्या घरी ते प्रथमच आले होते. घरच्यांचा परिचय प्रथमच झाला होता. गाडीत बिमलजींनी गप्पा सुरु केल्या. “श्यामराव, कुछ बाते तुम्हारी और मेरी सरीखी हैं। मेरी दो लडकीयाँ और एक लडका। आपका भी वैसाही हैं। मैं भी महानगर कार्यकर्ता और आप भी विभाग सहकार्यवाह के नाते महानगर कार्यकर्ता बनने जा रहे हैं।” आपल्यामध्ये काहीतरी साम्य आहे, हे सांगण्याचा बिमलजी प्रयत्न करीत होते. हा बादरायण संबंध जोडण्याच्या त्यांच्या प्रयत्नावर मी हसू लागलो. ते हसणे म्हणजे बिमलजींनी सुचविलेले दायित्व मी स्वीकारले आहे, असे गृहीत धरुन, बिमलजींनी विभाग कार्यवाहच्या कामासंबंधी गप्पा सुरु केल्या सुद्धा! ‘आपण सर्व संघाचे कार्यकर्ते. अधिकारी वगैरे या व्यवस्था आहेत. पण, कार्यकर्ता आणि अधिकारी यांच्यामध्ये मोकळेपणा असावा, जवळीक असावी’ हे बिमलजी सहजपणे आपल्या वागण्या-व्यवहारातून समजावत असतात.

दुसरा प्रसंग त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या वेळचा. लग्न नेपाळ येथे होते. बिमलजींनी दोन वेळा फोनवर सांगितले, लग्नाला येण्याचे नक्की करा. विमानाची तिकिटे काढून ठेवायची आहेत. पण, माझ्याच मनाची तयारी झाली नाही. घरी येणार्‍या प्रत्येकाचे अगदी अगत्याने आणि हसतमुखाने स्वागत करण्याचा सौ. केडिया वहिनींचा स्वभाव आहे. त्यांच्याही वागण्या-व्यवहारातून संघाचेच दर्शन घरी येणार्‍या प्रत्येकाला होत असते. बिमलजींनीच एकदा सांगितले होते, “आपण एका ध्येयाने प्रेरित होऊन अगदी वेड्यासारखे काम करीत असतो. पण, त्यामुळे घरी दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. घरात संघ जर आपण नीटपणे समजावू शकलो, तर आपण अधिक चांगल्याप्रकारे संघ काम करु शकतो.”

बिमलजी पुढे सांगू लागले, “महिन्यातून कोणताही एक रविवार मी पत्नीला देतो. त्या दिवशी प्रभात शाखेत जाऊन आल्यानंतर त्या दिवसाचे सर्व नियोजन पत्नी करते. तो पूर्ण दिवस मी कुटुंबासाठी देतो. त्या दिवशी कुठे जायचे, कुठे जेवायचे, कुणाला भेटायला जायचे हे सर्व पत्नी ठरविते. त्यामुळे घरी न्याय दिल्याचे समाधान आपल्याला मिळते आणि कुटुंबीयसुद्धा समाधानी राहतात.” माझ्या पत्नीच्या आजारपणाचे समजल्यावर बिमलजी एकदा भांडूपला घरी आले होते.

सर्व विचारपूस झाल्यावर बिमलजी माझ्या पत्नीला म्हणाले, “भाभीजी, चिंता नहीं करना सब कुछ ठीक हो जायेगा।

पत्नी : चिंता सिर्फ योगेशकी ही हैं।

बिमलजी : लडकीयों की शादी हो चुकी हैं। योगेशकी भी शादी करनी है क्या?

पत्नी : उसके शादीकी चिंता नहीं हैं। ऑटोमोबाईल करके आया मगर घरमेंही हैं। अभी तक अपने पैरोंपर खड़ा नहीं हैं।

बिमलजी : ये चिंता भी छोड दिजीये। योगेशको कलसेही मेरे साथ लेकर जाऊंगा।”

आणि बिमलजींनी योगेशला स्वतःच्या ऑफिसमध्ये स्वतःबरोबर ठेवले. योग्य नोकरी शोधून काही दिवसांनी योगेशला त्याठिकाणी पाठविले होते. बिमलजी म्हणजे नोकरी देणारे एक चालते-बोलते केंद्र आहे. त्यांच्या खिशात नेहमीच एक विशेष डायरी असते. नवीन परिचय झाल्यावर त्या डायरीत त्या व्यक्ती किंवा स्वयंसेवकाची नोंद होते आणि त्याला कुठे, कसे संघकामात किंवा एखाद्या सेवाकार्यात जोडता येईल, याचे विचारचक्र बिमलजींच्या डोक्यात सुरु होते. एखादा सामान्य शाखा कार्यकर्ता आणि तो जर बेरोजगार असेल, तर त्याची विशेष नोंद करुन त्याच्यासाठी योग्य ती नोकरी देण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. महानगरातील सामान्य शाखा कार्यकर्त्यापासून महानगर स्तरापर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी घेणारा अधिकारी म्हणजे बिमलजी!

पत्नीच्या आजारपणामुळे मी साडेतीन वर्षे आधीच नोकरीतून निवृत्ती घेतली होती. प्रोव्हिडंट फंड, ग्रॅज्युएटी म्हणून जे काही मिळते, ते पैसे आपल्याला जास्त वाटतात. एकत्र एवढी रक्कम कधीच आपण मिळवलेली नसते. बिमलजींना समजल्यावर त्यांनी चौकशी केली. पेन्शनसुद्धा नाही. त्यामुळे महिन्याच्या खर्चात आवश्यक तेवढी रक्कम मिळावी, अशी गुंतवणूक करावी. ही गुंतवणूक बँकेपेक्षा जास्त फायदा देणारी असावी, पण सुरक्षित असावी. ही सर्व चौकशी करून बिमलजींनी योग्य तिथे गुंतवणूक केली. पण, काही वर्षांनी तिथला व्याजदर कमी झाल्यावर संघाच्याच एखाद्या बँकेत गुंतवण्याचा सल्ला बिमलजींनी दिला. सामान्य स्थितीतील आपला कार्यकर्ता कुठे फसू नये, यासाठी अशाप्रकारे अनेकांना बिमलजींनी मार्गदर्शन केले आहे.

पत्नीच्या आजारपणात २००३ साली मी ऐरोलीत राहायला आलो. थोड्याच दिवसात पत्नी गेली. त्यानंतर एक दिवशी कै. रवि पवारांसह बिमलजी ऐरोलीत आले होते. दिवसभर घरी एकटेच राहायचे, त्याऐवजी प्रवासचक्र वाढवा. स्वयंसेवकांना भेटा. एकटेपणा घालवा. त्याचबरोबर आता वेळ भरपूर आहे. त्यामुळे ‘विभाग कार्यवाह’ अशी जबाबदारी स्वीकारण्याची सूचना देऊन बिमलजी गेले होते. २००८ सालापर्यंत घाटकोपर विभाग कार्यवाह अशी जबाबदारी सांभाळली आणि त्यानंतर नवी मुंबई जिल्हा सह संघचालक अशी जबाबदारी आली. काही कारणास्तव मी त्यावेळचे मा. प्रांत संघचालक बापूसाहेब मोकाशी यांना भेटून निवृत्ती घेतली.

२०१४ सालापासून प्रत्यक्ष संघाची काहीच जबाबदारी नव्हती. त्यामुळे एक प्रकारची अस्वस्थता आली होती. ‘संघ शताब्दी वर्ष’ येत आहे आणि त्यात माझी काहीच भूमिका नाही, ही गोष्ट माझी अस्वस्थता अजून वाढवीत होती. 2017 सालापासून मी पनवेल येथे राहायला आलो. पण, बिमलजींचे लक्ष होतेच. एक दिवस गाडी घेऊन आले आणि कर्जतला ‘स्नेहबंध’ या वृद्धाश्रमात घेऊन गेले. सर्व माहिती दिली. परिसर फिरुन दाखविला. “काही काम नाही. पण, आल्या-गेल्यांची विचारपूस करावी. जमेल तर पाहा.” असे बिमलजींनी सुचविले. पण, थोडा विचार केला. तिथली स्वच्छता, व्यवस्था, सोयी सर्व काही छानच होते. आबा वृद्धाश्रमात आहेत, हा संदेश जाईल आणि त्यामुळे माझ्या मुलांची बदनामी होईल, असा विचार करुन मी नकार दिला.

त्यानंतर ‘केशवसृष्टी’त एका अभ्यासवर्गात बिमलजी मला घेऊन गेले. ‘संघ शताब्दी वर्षात शंभर वनवासी गावे स्वयंपूर्ण’ करण्याचा संकल्प बिमलजींनी केला होता. त्या संकल्पातील वनवासी आणि शहरी कार्यकत्यांचा एकत्रित दोन दिवसांचा तो वर्ग होता. हा विषयसुद्धा खूप चांगला होता. पण, यासाठी प्रवास भरपूर करावा लागेल आणि शारीरिक स्थिती तशी नाही. त्यामुळे नाईलाजाने मला नकार द्यावा लागला.

पण, बिमलजी स्वस्थ बसले नव्हते किंवा माझा दोन वेळा नकार ऐकून नाराजही झाले नव्हते. त्यांनी तिसरा प्रयत्न केला आणि एक दिवशी ‘एकता सेवा संघा’च्या बैठकीत कामशेत येथे घेऊन गेले. अनाथ मुलांसाठी चाललेले हे काम पाहून मी खूपच प्रभावी झालो. मी बिमलजींना होकार दिला. मुलांची परवानगी घेऊन मी कामशेतला गेलो. मला तसे तिथे काही काम नव्हते, काही जबाबदारी नव्हती. मुलांशी चांगले नाते जुळले होते. मोकळेपणाने सर्व मुले-मुली बोलत होते. पण, आकस्मात साडेचार महिन्यांनंतर मला घरी यावे लागले. येताना एक अनुभव घेऊन आलो.

एखाद्या कार्यकर्त्याच्या मनातील व्यथा जाणून त्याची क्षमता पाहून त्याला योग्य त्या कामाशी जोडल्याची बिमलजींची कल्पकता अलौकिकच! ‘यशवंत भुवन’सारखे कार्यालय उभे करणे, ‘केशवसृष्टी’चा विकास, ‘केशवसृष्टी’च्याच आधाराने ठाणे जिल्ह्यात १०० गावे स्वयंपूर्ण करणे, ‘एकता सेवा संघा’सारखा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभा करणे इ. कितीतरी प्रकल्पांमध्ये बिमलजींचा सिंहाचा वाटा आहे. उद्योजक असलेल्या अशा एका कल्पक, कर्तृत्ववान आदर्श स्वयंसेवकाच्या खिशातील विशेष डायरीमध्ये माझे नाव आहे, हे माझ्यासाठी खूप गौरवास्पद आहे. ‘संघ शताब्दी वर्षा’त बिमलजींचाही अमृत योग संपन्न होत आहे. विमलजींना सुखी, संपन्न, उत्तम आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो, अशी सर्वशक्तीमान श्री परमेश्वरचरणी विनम्र भावे प्रार्थना करून मी बिमलजींना शुभेच्छा देतो.
आबा देसाई