महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेच्या कुशीत वसलेल्या तिलारी (tillari biodiversity) या जैवसंपन्न प्रदेशाबद्दल माहिती देणारा हा लेख...
सह्याद्रीच्या छायेत वसलेल्या महाराष्ट्राला अतिशय नयनरम्य निसर्गाची देणगी लाभली आहे (tillari biodiversity). या निसर्गसौंदर्याची परिसीमा म्हणजे दोडामार्ग तालुका (tillari biodiversity). अतिदुर्गम आणि अक्षरशः निसर्गाच्या कुशीत वसलेला तालुका (tillari biodiversity). या तालुक्यामधील तिलारी नदीचे खोरे हा असाच एक सुंदर आणि जैवविविधतेने नटलेला भाग. तिलारी नदीच्या दुतर्फा छोटी गावे आहेत (tillari biodiversity). वृक्षराजींनी समृद्ध अशा या भागात विपुल वनसंपदा आढळते. अनेक वर्षे तंत्रशुद्ध अभ्यास आणि सर्वेक्षण केल्यानंतर मला तिलारीच्या जैवविविधतेची ओळख नव्याने होऊ लागली आहे. तिलारीतील जंगल निमसदाहरित प्रकारचे असून बांबूच्या प्रजाती इथे विपुल प्रमाणात आढळतात. दर्यांमध्ये निमसदाहरित वने, नदीलगत असणारे सदाहरित वृक्ष, बांबूची बने, पाणथळीच्या जागा आणि डोंगरपठारांवर असणारे सडे या अधिवासांच्या वैविध्यतेमुळे हा प्रदेश जैवविविधतेने समृद्ध आहे. महाराष्ट्रातील एकमेव आणि अतिप्राचीन समजले जाणारे माय-वन (मायरेस्ट्रिका स्वॅम्प) तिलारीमध्येच पहायला मिळते.
तिलारीच्या खोर्यात अनेक सस्तन प्राण्यांचे वास्तव्य आहे. त्यांपैकी बहुतेक प्रजातींची संख्या चिंताजनक आहे. मुख्यत्वे आपला राज्यप्राणी शेकरू, हत्ती, रानगवे, सांबर, भेकर हे तृणभक्षी, तर पट्टेरी वाघ, बिबळे, अस्वले आणि रानकुत्रे असे मांसभक्षी प्राण्यांची नोंद या परिसरातून केली गेली आहे. तपकिरी उदमांजर, मुंगूस, पाणमांजर, रानमांजर, वाघाटी यांसारखे लहान सस्तन प्राणीसुद्धा इथे आढळून येतात. २१८ हून अधिक पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद तिलारीमधून करण्यात आली आहे. प्रामुख्याने घनदाट जंगलात प्रदेशनिष्ठ असणारे मलबारी कर्णा, धनेश, मलबारी कवड्या धनेश, मलबारी राखी धनेश, बेडूकतोंड्या, निलगिरी रानपारवा, रातवे, मलबारी कस्तुर, राखी-कपाळाची हरोळी, घुबडांच्या प्रजाती आणि पाणवठ्यावरचे पक्षी पहायला मिळतात. पश्चिम घाटातील सर्व १२ प्रदेशनिष्ठ पक्ष्यांचे वास्तव्य या खोर्यात आहे. उडणारा सरडा देखील इथल्या नारळी-पोफळीच्या बागांमध्ये दिसतो. मगर, घोरपड, नागराज, घोणस, अजगर असे अनेक सरपटणारे प्राणी आणि मलबार ग्लायडिंग फ्रॉग आणि मलबार ट्री टोड असे २५ हून अधिक प्रजातींचे प्रदेशनिष्ठ उभयचरही आढळतात.
तिलारीचे खोरे मोठ्या प्राण्याच्या हालचालीसाठी आणि वावरासाठी अत्यंत मोक्याचा कॉरिडोर आहे. तिलारीचे भौगोलिक स्थान महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांच्या संगमावर असल्याने, या राज्यातील संरक्षित क्षेत्रांना जोडणारा तिलारी हा महत्त्वाचा दुवा आहे. कर्नाटकातील ‘काली व्याघ्र प्रकल्प’, भीमगड वन्यजीव अभयारण्य, गोव्यातील म्हादेई वन्यजीव अभयारण्य आणि महाराष्ट्रातील ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ अशी प्रमुख वने तिलारीच्या लगत आहेत. वन्यजीवांच्या अधिवासासाठी तिलारीची उपयुक्तता पाहाता, यावर्षी या खोर्यातील काही भूप्रदेश ‘तिलारी संवर्धन क्षेत्र’ म्हणून संरक्षित करण्यात आले आहे. जवळपास दहा गावांना लागून असलेला आणि वनविभागाच्या मालकीचा २९.५३ चौ. किमीचा भूप्रदेश वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. हजारो वर्षे देवराईच्या माध्यमातून केल्या जाणार्या पारंपरिक वनसंवर्धन पद्धतीला यामुळे अधिक बळकटी मिळाली आहे. स्थानिक लोकांच्या सहभागातून महत्त्वाच्या अधिवासाचे संरक्षणही काही गावांत केले जाते. विणीच्या हंगामात मासेमारी न करता, चढणीच्या माशांचे संवर्धन एका गावाजवळच्या पाणथळींच्या ठिकाणी केले जाते. जंगलातच नव्हे, तर अगदी गावामध्येही वृक्षसंपदा भरपूर प्रमाणात दिसते. घराभोवतीच्या परसामध्ये (कुळागरांमध्ये) वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा-वेलींचा समावेश केलेला दिसतो. त्यामुळे पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी अगदी घराच्या आजूबाजूलासुद्धा सहजपणे वावरतात.
मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड, विस्तारणारी रबर-अननस यांची एकसुरी लागवड, अवैध्य खाणकाम, शिकार आणि नदीपात्रातून होणारा वाळू उपसा, तसेच यापूर्वी संवर्धन क्षेत्राचा अभाव यांमुळे तिलारीचे नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यप्राण्यांचे अधिवास धोक्यात आले आहे. व्यावसायिक नफ्यासाठी निसर्गाला हानी न पोहोचवता, इथल्या निसर्गाचा समतोल राखत कृषी पर्यटन, पक्षी पर्यटन, बांबू शेती यांसारख्या निसर्गपूरक पर्यायांचा विचार स्थानिक आणि प्रशासकीय पातळीवर होणे गरजेचे आहे. तरुण पिढीने शाश्वत विकासाचे मार्ग पडताळून पाहण्याची ही योग्य संधी आहे. वन्यप्राण्यामुळे होणार्या शेतीच्या नुकसानामुळे शेतकरी त्रस्त आहेत आणि तरुण पिढी शेती आणि निसर्गापासून दुरावत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील काही तरुण पर्यटनाच्या माध्यमातून वन्यजीव व पारंपरिक जीवनपद्धतींचे संवर्धन करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहेत. भविष्यातील प्राणीसंख्या शाबूत ठेवण्यासाठी या संभाव्य धोक्यांवर मात करणे आवश्यक आहे. जनजागृती, शिकार न करण्याबाबत तसेच शेतीचे नुकसान कमी करण्याचे उपाय यांवरील शिक्षण आणि प्रबोधनामुळे तिलारी खोर्यात प्राणी आणि मनुष्य यांतील सहजीवन शक्य होऊ शकेल.