मुंबई : (Amol Mitkari on Rohit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दि. २५ नोव्हेंबर रोजी कराड येथील प्रीतीसंगमावर जाऊन महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी अजित पवार व कर्जत जमखेडचे आमदार रोहित पवार यांची भेट झाली.या भेटीवेळी अजित पवार रोहित पवारांना “शहाण्या थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर काय झालं असतं. दर्शन घे काकांचे” असं मिश्कीलतेने म्हणाले. त्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.
दरम्यान, अजित पवारांनी कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवारांच्या विरोधात उभे राहिलेले भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली असती, एखाद्या सभेला संबोधित केलं असतं किंवा प्रचार केला असता तर रोहित पवार पराभूत झाले असते असं स्वतः राम शिंदे म्हणाले आहेत. यावर रोहित पवार म्हणाले, “कदाचित उलटा निकाल लागला असता. मात्र, अजित पवार बारामतीत अडकून पडले होते”.
शरद पवारांनी अजित पवारांविरोधात घरातील उमेदवार (युगेंद्र पवार) दिला होता. तसेच प्रचारासाठी ते स्वतः मैदानात उतरले होते. त्यामुळे अजित पवारांना यावेळी राज्यातील इतर मतदारसंघांपेक्षा बारामतीमध्ये अधिक लक्ष द्यावं लागलं, यावरून रोहित पवारांनी अजित पवारांना चिमटा काढला.
रोहित पवारांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत म्हटलं आहे की “दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीसमोर नतमस्तक झाल्यावर हा (रोहित पवार) किती खोटं बोलतोय. बारामतीमध्ये पाय धरून काका माझ्या मतदारसंघात येऊ नका ही विनंती करुन, आज मस्तीत बोलतोय. जय पवार, पार्थ पवार यांच्यापैकी कोणी एक जरी कर्जत-जामखेडमध्ये फिरला असता तरी याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता. खोटारडा!” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.