मुंबई : सेंट झेवियर्स महाविद्यालयातील ‘इंडियन म्युझिक ग्रुप’ (IMG) तर्फे ‘विरासत’ या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी या दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन भारतीय शास्त्रीय संगीत स्पर्धा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ व ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता संत झेवियर्स महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. नवोदित गायकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी स्पर्धेतून निवड होणाऱ्या ३ स्पर्धकांना दुसऱ्या दिवशी नामवंत कलाकारांसमोर त्यांची कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. या महोत्सवाला सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. वेंकटेश कुमार, प्रसिद्ध बासरी वादक पं रोणू मजुमदार आणि त्यांचे सुपुत्र ऋषिकेश मजुमदार विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला ‘इंडसइंड बँक’ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अधिकाधिक संगीत प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.