मुंबई : भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांत, बोरीवली भाग आणि बोरीवली सांस्कृतिक केन्द्रातर्फे ‘इतिहास कट्टा, पर्व दुसरे : गोष्ट 'ती'ची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता 'वनविहार उद्यान' , ऑफ देवीदास लेन, एक्सर, बोरीवली पश्चिम, मुंबई’ येथे होणार आहे. इतिहास संशोधिका व लेखिका डॉ. अनुराधा रानडे या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्यात्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. ‘१८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील वीरांगना’ या विषयावर त्या व्याख्यान देणार आहेत.
१७५७ ला झालेल्या प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटीशांच्या इस्ट इंडिया कंपनीने पुढच्या पन्नाससाठ वर्षात अवघा भारत आपल्या सत्तेखाली आणला. गुलामगिरीच्या आणि ब्रिटीशांच्या अन्यायाविरोधात भारतीयांनी अनेक ठिकाणी उठाव केले. पण ब्रिटिशांच्या जुलुमी राजवटीविरोधात भारतीयांनी दिलेला प्रभावी देशव्यापी लढा म्हणजे १८५७ चे स्वातंत्र्यसमर. बराकपूर आणि मेरठ छावणीतून सुरु झालेले हे युद्ध हिंदुस्थानभर पसरले. या रणसंग्रामात अनेक वीरांगनांचा सहभाग होता. काही रणांगणावर प्रत्यक्ष लढल्या तर काही गुप्तपणे परंतु झाशीची राणी लक्ष्मीबाई सोडल्यास या कालखंडात ब्रिटीशांविरोधात उभ्या ठाकलेल्या इतर वीरांगनांबद्दल फारसे बोलले जात नाही. कित्तूरची राणी चेन्नमा, पंजाबची वाघीण जिंदन कौर, अवधची बेगम हसरत व तिच्या साथीदार, झाशीच्या राणीबरोबर झुंजलेल्या तिच्या सख्या, राणी तपस्विनी, बंगालची देवी चौधराणी, गदीशपूरच्या महिला, इंदुरच्या भीमाबाई होळकर, ग्वाल्हेरच्या बायजाबाई शिंदे, सातपुड्यातील भिल्लिणी, तुळसापूर - रामगढ - अहिरीगढच्या राण्या, कोल्हापुरच्या ताईबाई अशा कितीतरी ज्ञात अज्ञात स्त्रियांनी ब्रिटीशांना जेरीस आणले. या विरांगणांची ओळख डॉ. अनुराधा रानडे आपल्या व्याख्यानातून करून देणार आहेत. ब्रिटीशांविरोधात पराक्रमाचे रणशिंग फुंकलेल्या ज्ञात-अज्ञात तेजस्विनींबद्दल जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.