कल्याण पूर्वेत गणपत गायकवाडांनाच पसंती; पत्नी झाली पहिली महिला आमदार
24-Nov-2024
Total Views |
कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघातून महायुतीकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड ( Sulabha Gaikwad ) यांना उमेदवारी देण्यात आली. कल्याण पूर्वेत कोणाला उमेदवारी दिली जाणार, याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात होते. पण, महायुतीने सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे एक महिला उमेदवाराला आमदार होण्याची संधी महायुतीने दिली असून त्या संधीचे त्यांनी सोने केले आहे.
सुलभा गायकवाड यांच्यासमोर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे धनंजय बोडारे आणि अपक्ष उमेदवार महेश गायकवाड व वंचित बहुजन आघाडीचे विशाल पावशे यांचे आवाहन होते. पण, गणपत गायकवाड यांचा असलेला दांडगा जनसंपर्क यांच्या जोरावर सुलभा यांना गड राखणे सोपे झाले. जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर गणपत गायकवाड हे कारागृहात आहेत. त्यामुळे गृहिणी असलेल्या सुलभा या घराबाहेर पडल्या आणि शहरातील विकासकामांमध्ये त्यांनी लक्ष घातले. सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विनोद तावडे, मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सुलभा गायकवाड यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती. भाजप नेत्या स्मृती इराणी आणि खा. रवी किशन हेदेखील त्यांच्या प्रचारार्थ उतरल्या होत्या.