मतदारांचेच फेकाफेकीला थेट प्रत्युत्तर

    24-Nov-2024
Total Views |
Mahayuti

लांगूलचालन करून सत्ता मिळवण्याची स्वप्ने पाहणार्‍या महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवला आहे. काँग्रेस-शरद पवार आणि उबाठा गटाचा विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला असून, ६०च्या आतच त्यांचा डाव आटोपला आहे. भाजपने ‘न भूतो’ अशी विक्रमी कामगिरी करीत भल्याभल्यांना धोबीपछाड दिला आहे. भाजपच्या ( BJP ) या महाविजयाची पाच कारणे...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपसह महायुतीची मोठी पीछेहाट झाली. त्यामुळे या निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीने भाजप आणि महायुतीसाठी मोर्चेबांधणी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक तळागाळापर्यंत पोहोचले. भाजपची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यात संघाचा मोठा हातभार लागला. यासाठी बैठकांचा सपाटा लावण्यात आला. कामाची दिशा ठरवण्यात आली. ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’, ‘वनवासी कल्याण आश्रम’, ‘विश्व हिंदू परिषद’, ‘भारतीय विचार मंच’, ‘सहकार भारती’, ‘भटके विमुक्त विकास परिषद’ यांसह संघाच्या विविध शाखांचे स्वयंसेवक मैदानात उतरले. त्यांनी महायुतीच्या विजयासाठी पोषक वातावरण तयार केले.

देवेंद्र फडणवीस यांची रणनीती

विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. ‘महाराष्ट्राचा चाणक्य’ म्हणवणार्‍या शरद पवारांवर त्यांनी सलग तिसर्‍यांदा मात केली. भाजपला सलग तीनवेळा १०० पार नेले. असा पराक्रम आजवर महाराष्ट्रात कोणत्याच नेत्याला जमलेला नाही. लोकसभेतील दारूण पराभवानंतर महाराष्ट्रातील भाजपचा कार्यकर्ता खचला होता. त्यावेळी केंद्रीय नेतृत्त्वाने जागावाटप ते प्रचारयंत्रणा, असे संपूर्ण अधिकार फडणवीसांना बहाल केले. आणि या संधीचे त्यांनी सोने करून दाखविले. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या संपूर्ण इकोसिस्टीमने एकट्या देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. पण, महाराष्ट्र कुणासोबत होता, हे आजच्या निकालांनी दाखवून दिले.

फडणवीसांची विकासाची धोरणे आणि धाडसी निर्णय

महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये देवेंद्र फडणवीसांना ‘इन्फ्रामॅन’ म्हणून ओळखले जाते. शांत आणि संयमी स्वभावामुळे ते अनेकांचे ‘हिरो’ आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन फडणवीसांवर व्यक्तिगत टीका केली. ही टीका अगदी कुटुंबापर्यंत गेली होती. पण, त्यांनी कायमच संयमाने उत्तरे दिली. कधीही तोल ढळू दिला नाही.

दुसरे म्हणजे, महाराष्ट्रात कधी नव्हे ती विकासकामे २०१४ ते २०१९ या कालखंडात झाली. त्यालाच पूर्णत्व प्राप्त होताना महाराष्ट्राने २०२२ ते २०२४ या कालखंडात पाहिले. विरोधक गुजरात आणि कर्नाटकचे गोडवे गात असताना देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक ५२ टक्के गुंतवणूक आणत त्याला सडेतोड उत्तर दिले.

संपूर्ण निवडणूक कालावधीत भाजपने टाळलेली चुकीची विधाने
 
चर्चेतील नेत्यांनी ऐन मोक्यावर चुकीची विधाने करून राजकारणाचा खेळखंडोबा केल्याची उदाहरणे याआधी भाजपमध्ये पहायला मिळली आहेत. या निवडणुकीत भाजपच्या एकूणएक नेत्यांनी चुकीची आणि आक्षेपार्ह विधाने टाळली. त्यामुळे निवडणूक अन्य कोणत्याही मुद्द्यांवर न भरकटता विकास, हिंदुत्व, लाडकी बहीण आणि अन्य प्रमुख मुद्द्यांभोवती फिरली. एकंदरीत, देवेंद्र फडणवीस यांची रणनीती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ग्राऊंडवरील काम, तसेच भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमधील एकवाक्यता, भाजपच्या ऐतिहासिक विजयाला कारणीभूत ठरली.

देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा

कायम विकासाचा चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहराही या विधानसभा निवडणुकीने अनुभवला. काश्मिरात तिरंगा फडकावणारा, राम मंदिरासाठी तिन्ही कारसेवांमध्ये उपस्थित असणारा मुळातच हा आक्रमक हिंदुत्ववादी चेहराच होता. गेल्या दोन निवडणुकांमध्ये ‘व्होट जिहाद’ आक्रमकपणे पुढे आल्यानंतर त्यांच्यातील हिंदुत्व त्यांना स्वस्थ बसू देणारे नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक है तो सेफ है’ या नार्‍याला तळागाळात पोहोचवत देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना जागृत केले.
महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणे

उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत सहानुभूती होती, विधानसभेला ती दिसली नाही. जागावाटपात प्रसंगी काँग्रेससोबत वादंगही झाला. परिणामी मोठा पराभव झाला.

कोकणात उबाठाचा सुपडा साफ झाला आहे. गुहागरमधून भास्कर जाधव वगळता, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील उमेदवारांचा मोठा पराभव झाला आहे.

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकुर निवडणूक प्रक्रियेत दिसले नाहीत. तसेच, प्रचारातही प्रभाव दाखवू न शकल्याने त्यांचा पराभव झाला.

महाविकास आघाडीत उबाठा, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनीच एकमेकांची खेचाखेची केल्याचा परिणाम निवडणुकीत दिसला.

महाविकास आघाडी लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात विशेष प्रभाव दाखवू शकली नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे दिसले.

महायुतीने महाविकास आघाडीचे ‘फेक नॅरेटिव्ह’ खोडून काढण्यात यश मिळवले. तसेच, सत्ताधार्‍यांप्रमाणे सक्षम योजना पोहोचवण्यात सपशेल अपयशी ठरले.

सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने हिंदू मतदारांमध्ये नाराजी होती. याचाही फटका बसला आहे.

मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याबाबत निश्चित मत नसल्याने महाविकास आघाडीबाबत नाराजी होती. मतदारांनी मतपेटीतून ती व्यक्त केली.

राहुल, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे किंवा अन्य कोणत्याही काँग्रेस नेत्याचा प्रभाव निवडणुकीत दिसला नाही.