विधानसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीत मतदारांवर चालली महायुतीची जादू

24 Nov 2024 15:07:44
Ravindra Chavan

कल्याण : विधानसभा निवडणुकीत कल्याण-डोंबिवलीतही महायुतीला ( Mahayuti ) अभूर्तपूर्व यश मिळाले आहे. कल्याण -डोंबिवलीतील चार विधानसभा मतदार संघांपैकी डोंबिवली विधानसभा मतदारसंघात रविंद्र चव्हाण, कल्याण ग्रामीणमधून राजेश मोरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड तर कल्याण पश्चिममधून विश्वनाथ भोईर यांनी विजयश्री खेचून आणली आहे.

रविंद्र चव्हाण यांना मतदारांनी चौथ्यांदा पसंती दिल्याने त्यांनी विजयाचा चौकार मारला आहे. राजेश मोरे आणि सुलभा गायकवाड या नवीन चेहर्‍यांना मतदारांनी संधी दिली आहे. तर प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहर्‍याला संधी देणार्‍या कल्याण पश्चिम मतदारसंघातील मतदारांनी विश्वनाथ भोईर यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.

डोंबिवली मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार रविंद्र चव्हाण यांची खरी लढत महाविकास आघाडीचे (उबाठा) दिपेश म्हात्रे यांच्याशी झाली. पहिल्या फेरीपासूनच रविंद्र चव्हाण हे आघाडीवर होते. रविंद्र चव्हाण यांनी १ लाख, २३ हजार, ८१५ मते मिळविली आहेत. तर दिपेश म्हात्रे यांना ४६ हजार, ७०९ मते मिळाली आहेत. तर नोटाला २ हजार, ७४५ मतदारांनी पसंती दिली आहे. रविंद्र चव्हाण यांनी ७७ हजार, १०६ मताधिक्य मिळवून विजय मिळविला आहे.

रविंद्र चव्हाण यांना २००९ मध्ये ६१ हजार, १०९ मते , २०१४ मध्ये ८३ हजार, ८७२ आणि २०१९ मध्ये ८६ हजार, २२७ मते मिळाली होती. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या मतांमध्ये वाढ झाली असून त्यांना १ लाख, २३ हजार, ८१५ मते मिळाली आहेत. त्यांनी आपला बालेकिल्ला चौथ्यांदा राखला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी विजयी झाल्याचे प्रमाणपत्र दिले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिषबाजी आणि गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. विजय निश्चित झाल्यानंतर संत सावळाराम क्रीडासंकुलातून जल्लोष रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर चव्हाण यांनी गणपती मंदिरात येऊन गणेशाचे दर्शन घेतले.

डोंबिवली पूर्वेतील क्रीडा संकुलातील कै. सुरेंद्र बाजपेयी बंदिस्त सभागृहात डोंबिवली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणीसाठी एकूण २३ फेर्‍या झाल्या. प्रथम पोस्टल बॅलेट पेपर मोजणी झाली. तेव्हापासून रविंद्र चव्हाण यांनी आघाडी घेत अखेर बाजी मारली.

पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांना मतमोजणी आवारात प्रवेश करता येत नव्हता. परिणामी, कार्यकत्याचा लवाजमा घरडा सर्कल येथे गर्दी करून होता. दहाव्या फेरीनंतर चव्हाण याचा विजय नक्की होणार, असे दृष्टीक्षेपात येताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरूवात केली. भाजप झिंदाबाद, रविंद्र चव्हाण झिंदाबाद अशा घोषणा देत गुलाल उधळण सुरू झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाडू भरवत आनंदोत्सवात साजरा केला. अखेर शेवटच्या २३व्या फेरीत रविंद्र चव्हाण यांना विजयी घोषित करण्यात आले.

Powered By Sangraha 9.0