हिंदू एकजुटीची दिव्य अनुभूती; नाशकात फक्त महायुती

जिल्ह्यातून महाविकास आघाडी हद्दपार

    24-Nov-2024
Total Views |
Mahayuti

नाशिक : संपूर्ण नाशिक ( Nashik ) जिल्ह्यातून महाविकास आघाडीला मतदारांनी नाकारत हद्दपार करण्याचे काम केले आहे. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ झालेला सामना महायुतीने १५ पैकी १४ जागा असा जिंकला आहेत. तर मालेगाव मध्य या एका जागेवर एमआयएमने अपक्ष उमेदवाराचा पराभव करत ७५ मतांनी निसटता विजय मिळवला. शनिवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांवरून नाशिक जिल्हा भगवामय झाल्याचे दिसून आले. दरम्यान, शेतकरीबहुल असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देताना वीजबिल माफ केले. तसेच लोकसभेला अडचणीची ठरलेली कांदा निर्यातबंदी उठवल्याचा फायदादेखील महायुतीला झाला आहे. उमेदवारांची घोषणा करताना कोणताही नवीन प्रयोग न करता विद्यमान आमदारांनाच पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय महायुतीकडून घेतला गेला. त्यातच निवडणुकीला कलाटणी देणार्‍या ‘लाडकी बहीण योजने’चा लाभ नाशिक जिल्ह्यातील महिलावर्गाने मोठ्या प्रमाणावर घेतला. त्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ नाशिकमधील विजयाने महायुतीला मिळाले आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला पाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सात, शिवसेनेला दोन तर एमआयएमच्या खात्यात एक जागा गेली आहे. यामध्ये नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, चांदवड-देवळा आणि बागलाण या मतदारसंघात भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने देवळाली, इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, कळवण-सुरगाणा, दिंडोरी-पेठ, निफाड, सिन्नर आणि येवल्यातून विजय मिळवला आहे. शिवसेनेने मालेगाव बाह्य आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. तर मालेगाव मध्यची जागा एमआयएमच्या खात्यात गेली आहे.

नाद घुमला...पश्चिममध्ये फुलले कमळ

भाजपचा गड असलेला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ आ. सीमा हिरे यांनी तिसर्‍यांदा सर केला आहे. सीमा हिरे यांना १ लाख, ४१ हजार, ७२५ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर यांना ७५ हजार, ५४८ मते मिळाली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिनकर पाटील यांना ४६ हजार, ६४९ मते मिळाली. नाशिक पश्चिममध्ये झालेल्या तिरंगी लढतीत हिरे यांनी ६८ हजार, १७७ मतांनी विजय मिळवला. सलीम कुत्तासोबत संबंध असलेले सुधाकर बडगुजर यांना पश्चिमच्या मतदारांनी सपशेल नाकारले आहे. तर रेल्वे इंजिनही सुरु होण्याआधीच बंद पडले आहे. दिनकर पाटील यांच्याकडून सीमा हिरे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर आरोप झाले होते. परंतु, कोणत्याही क्षणी जनतेसाठी उपलब्ध होणार्‍या आ. हिरे यांना पश्चिमच्या मतदारांनी पुन्हा एकदा संधी दिली आहे.

राहुल ढिकलेंनी राखला पूर्वचा गड

नाशिक पूर्वचा गड राखण्यात राहुल ढिकले यांना दुसर्‍यांदा यश आले आहे. त्यांना १ लाख, ५४ हजार, ६७१ तर शरद पवार गटाच्या गणेश गीते यांना ६७ हजार, १३६ मते मिळाली. ढिकले यांनी गीते यांच्यावर ८७ हजार, ५३५ मतांच्या फरकाने विजय मिळवला. तसेच विजयी राहण्याची परंपरा ढिकले कुटुंबाने कायम राखली आहे. मतदारसंघात ढिकले यांनी नारळ फोडलेले प्रत्येक विकासकाम पूर्ण केले. त्यामुळे भाजपचा गड राखण्यात राहुल ढिकले यांना यश आले आहे. मतदारसंघात भाजपला मानणारा मोठा मतदार असल्याने एकगठ्ठा मतदान भाजप उमेदवार राहुल ढिकले यांना पडले. तसेच मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ढिकले यांना जनता भाजपच्या बाजूने वळवण्यात यश आले. परिणामी, भाजपचा गड राखण्यात राहुल ढिकले यशस्वी ठरले.

देवयानी फरांदेही सलग तिसर्‍यांदा विजयी

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून देवयानी फरांदे यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेले उबाठा गटाचे उमेदवार वसंत गीते यांना १७ हजार, ८५६ मतांनी पराभवाची धूळ चारली आहे. देवयानी फरांदे यांना १ लाख, ५ हजार, ६८९ तर वसंत गीते यांना ८७ हजार, ८३३ मते मिळाली. देवयानी फरांदे यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाच्या माध्यमातून सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला. मराठा आणि धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये शिक्षण घेताना राहण्याची अडचण येऊ नये म्हणून वसतिगृहांची निर्मिती केली. तसेच शहराला लाभलेला धार्मिक वारसा जपत मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्याचप्रमाणे एखाद्या विमानतळाप्रमाणे नाशिकमध्ये बसस्थानक उभारल्याचा फायदा मिळाल्याने भाजपच्या देवयानी फरांदे विजयी ठरल्या आहेत.

देवळालीत विकासकन्येचा दुसर्‍यांदा विजय

राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सरोज अहिरे यांना तब्बल ८१ हजार, ६८३ शिवसेनेच्या राजश्री अहिरराव यांना ४१ हजार, ४ तर उबाठा गटाचे योगेश घोलप यांना ३९ हजार, २७ इतकी मते मिळाली. तिरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अहिरे यांनी अहिरराव यांचा ४० हजार, ६७९ मतांनी पराभव केला. तर उबाठाचे योगेश घोलप तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. उबाठा गटाचे बबन घोलप आणि त्याचे पुत्र योगेश घोलप या दोघा पितापुत्रांनी देवळालीचे विधानसभेत प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र या दोघांकडून कोणतेच भरीव असे विकास काम करण्यात आले नाही. तर पहिल्यांदाच आमदार झालेल्या सरोज अहिरे यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. दरम्यान, आहिरे यांच्या विजयाने देवळाली मतदारसंघात चाललेली घोलप कुटुंबाची सद्दी अखेर संपुष्टात आली आहे.

देवाभाऊंचा शब्द चांदवडकरांनी केला खरा

चांदवड-देवळा मतदारसंघातून डॉ. राहुल आहेर यांनीदेखील विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत बघायला मिळाली. त्यात भाजपमधून बंडखोरी केलेले त्यांचे बंधू केदा आहेर यांनी आव्हान उभे केले. पण, चांदवडच्या मतदारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता विकासाच्या बाजूने मतदान केले आहे. डॉ. राहुल आहेर यांनी ४८ हजार, ९६१ मतांनी विजय मिळवला. राहुल आहेर यांना १ लाख, ४ हजार, ८२६ मते मिळाली. दुसर्‍या स्थानी असलेले प्रहार जनशक्ती पार्टीचे गणेश निंबाळकर यांना ५५ हजार, ८६५ तर तिसर्‍या स्थानी असलेले भाजपचे बंडखोर केदा आहेर यांना ४८ हजार, ७२४ तर चौथ्या स्थानी फेकले गेलेले काँग्रेसचे शिरिष कोतवाल यांना २३ हजार, ३३५ मते मिळाली. आहेर यांना २० हजारांहून अधिक मताधिक्य मिळाल्याने आता चांदवडकरांच्या वाट्याला कॅबिनेट मंत्रिपद येणार आहे.

येवलेकरांची चौथ्यांदा विकासाला साथ

येवल्यातून छगन भुजबळ यांनी सलग चौथ्यांदा येवल्याची जागा राखली आहे. एकेकाळी त्यांचे सहकारी असलेले शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे यांचा भुजबळांनी २६ हजार, ४०० मतांनी पराभव केला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना १ लाख, ३५ हजार, २३ तर पराभूत माणिकराव शिंदे यांना १ लाख, ८ हजार, ६२३ मते मिळाली. येवला मतदारसंघातील नागरिकांनी विकासाच्या बाजूने कौल देत इतर सर्व मुद्दे नाकारले आहेत. विकासाच्या आड येणार्‍यांना येवला मतदारसंघातील जनतेने चांगलाच धडा शिकवला आहे. यावेळी येवला संपर्क कार्यालय परिसरात ढोल ताशांचा गजर, गुलाल उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे, जरांगे फॅक्टरला येवलेकरांनी नाकारत विकासाला साथ दिली.

दिलीप बनकरांना निफाडकरांचा कौल

राष्ट्रवादी काँग्रेसचे निफाड मतदारसंघाचे उमेदवार दिलीप बनकर यांनी सलग दुसर्‍यांदा निफाडमधून विजय संपादन केला आहे. त्यांनी उबाठा गटाचे उमेदवार अनिल कदम यांचा २९ हजार, २३९ मतांनी पराभव केला आहे. दिलीप बनकर यांना १ लाख, २० हजार, २५३ आणि पराभूत उमेदवार अनिल कदम यांना ९१ हजार, १४ मते मिळाली आहे. दरम्यान, अजित पवार महायुतीमध्ये गेल्यानंतर दिलीप बनकर यांनीही त्यांना मोलाची साथ दिली. मागील दोन वर्षांमध्ये निफाडमध्ये दिलीप बनकर यांनी मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावला होता. तसेच पाणलेट क्षेत्र वाढविण्यासाठी विकास निधी आणून खर्च केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिलीप बनकर यांना यंदाच्या निवडणुकीत निफाडच्या जनतेने निफाडचा विकास साधण्यासाठी दुसर्‍यांदा विजयी केले आहे.

दादा भुसेंनी परंपरागत बालेकिल्ला राखला

शिवसेनेचा परंपरागत बालेकिल्ला असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात दादा भुसे यांनी दणदणीत विजय मिळवला. भुसे यांनी १ लाख, ६ हजार, ६०६ मतांनी विजयश्री मिळवली. एकेकाळी त्यांचे सोबती असलेले बंडू बच्छाव यांचा त्यांनी पराभव केला. तर उबाठा गटाचे अद्वय हिरे तिसर्‍या क्रमांकावर राहिले. दादा भुसे यांना १ लाख, ५८ हजार, २८४, अपक्ष बंडू बच्छाव यांना ५१ हजार, ६७८ तर उबाठा गटाचे अद्वय हिरे यांना फक्त ३९ हजार, ८४३ मते मिळाली. अद्वय हिरे यांचे वडील प्रशांत हिरे यांचा पराभव करत दादा भुसे यांनी पहिल्यांदा विधानसभेत पाऊल टाकले होते. तेव्हा बंडू बच्छाव यांनी त्यांच्या विजयात मोठा हातभार लावला होता. त्यानंतर सातत्याने भुसे निवडून येत आहेत. मतदारसंघातील जनतेबरोबर ठेवलेल्या संपर्कामुळे दादा भुसे यांचे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत वाढल्याचे दिसून येते.

खोसकरांनी भेदला काँग्रेसचा गड

हिरामण खोसकर यांनी इगतपुरी- त्र्यंबकेश्वर या काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावला आहे. या मतदारसंघात चौरंगी लढत बघायला मिळाली. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत खोसकर यांनी ८६ हजार ५८१ मतांनी विजय मिळवला आहे. खोसकर यांना १ लाख १७ हजार ५७५, तर त्यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे लकी जाधव यांना ३० हजार ९९४ मते मिळाली. अपक्ष उभ्या असलेल्या माजी आमदार निर्मला गावित यांना २३ हजार ७७६ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार माजी आ. काशिनाथ मेंगाळ यांना २० हजार ३७४ मते मिळाली. खोसकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यानंतर त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी देत निवडणुकीत रिंगणात उतरवले होते.

माणिकराव कोकाटेंचा सिन्नरमधून विजय

सिन्नरला विकासाच्या मार्गावर आणणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले माणिकराव कोकाटे यांनी दुसर्‍यांदा विजय संपादन केला आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या उदय सांगळे यांचा ४० हजार ८८४ मतांच्या फरकाने पराभव केला आहे. माणिकराव कोकाटे यांना १ लाख ३८ हजार ५६५ तर पराभूत उमेदवार उदय सांगळे यांना ९७ हजार ६८१ मते मिळाली. दुष्काळाच्या छायेत असलेला तालुका म्हणून सिन्नरची ओळख आहे. त्यामुळे दूरदृष्टी असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे या भागात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यातून स्थानिकांना रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला. तिसर्‍या फेरीपासून आघाडीवर असलेल्या कोकाटे यांच्या विजयाचा जल्लोष १२ व्या फेरीपासून कार्यकर्त्यांनी साजरा करायला सुरुवात केली. तसेच घोषणेआधीच विजयाचे बॅनर समर्थकांकडून लावण्यात आले.

एमआयएमने राखली आपली जागा

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ एमआयएमला राखण्यात यश आले. मुफ्ती यांचा केवळ १६२ मतांनी निसटता विजय झाला आहे. मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष आसिफ शेख रशीद यांचा थोड्या फरकाने पराभव केला आहे. शेख रशीद यांना १ लाख ९ हजार ४९१ मते मिळाली. एमआयएमने २०१९ मध्ये इस्माईल अब्दुल खालीक यांना तिकीट दिले होते. तर सपाने निहाल अहमद यांच्या कन्या शाने-ए-हिंद डिग्निटी यांना उमेदवारी जाहीर केली. तर आसिफ शेख हे देखील रिंगणात उतरले होते. त्यामुळे मुस्लीम समाजाचे वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघात नेमकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर इस्माईल यांचा विजय झाला.

कळवणमध्ये माकपचा धुव्वा

अर्जून तुळशिराम पवार यांनी बांधणी केलेल्या कळवण- सुरगाणा मतदारसंघातील जनतेने त्यांचे पुत्र नितीन पवार यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या नितीन पवार यांनी ८ हजार, ५१९ मतांनी विजय संपादन केला. नितीन पवार यांना १ लाख, १८ हजार, ३६६ तर त्यांचे प्रतिस्पर्धी माकपचे उमेदवार जिवा पांडू गावित यांना १ लाख, ९ हजार, ८४७ मते मिळाली. कळवण-सुरगाणा मतदारसंघात वाडी-वस्तीपर्यंत रस्त्यांचे जाळे विणण्यात आले आहे. त्याचबरोबर या भागात शेतीसाठी १२ महिने पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे यावेळीही विकासाला मतदान झाल्याने नितीन पवार सलग दुसर्‍यांदा विजयी झाले आहेत.

नरहरी झिरवाळच दिंडोरीतून वरचढ

अजित पवार यांना साथ दिलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना दिंडोरीच्या मतदारांनी चौथ्यांदा विधानसभेत पाठवले आहे. त्यांनी शरद पवार गटाच्या सुनिता चारोस्कर यांचा ४४ हजार, ४०३ मतांनी पराभव केला. झिरवाळ यांना १ लाख, ३८ हजार, ६२२ तर पराभूत सुनिता चारोस्कर यांना ९४ हजार, २१९ मते मिळाली. सुनिता चारोस्कर यांचे पती रामदास चारोस्कर दोन वेळा दिंडोरी विधानसभेचे आमदार राहिले आहेत. पण, निवडून आल्यानंतर जनतेसोबत कोणत्याही प्रकारचा संपर्क न ठेवल्याने त्यांना दिंडोरीच्या मतदारांनी घरी बसवत जनतेते मिसळणारे नरहरी झिरवाळ यांना आमदार केले. दिंडोरी मतदारसंघात सर्वात मोठा असलेला रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यास झिरवाळ यांनी सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाल्याचे बोलले जात आहे.

विकासकामांच्या जोरावर कांदेंचा विजय

जिल्ह्यातील बहुतांश आमदारांना पुन्हा एकदा आमदार होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. यामध्ये नांदगावमधून शिवसेनेचे विद्यमान आ. सुहास कांदे विजयी झाले. कांदे यांना २४ व्या फेरी अखेर १ लाख, ३५ हजार, ७७८ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना ४७ हजार, १३० मते मिळाली आहेत. त्यामुळे सुहास कांदे यांचा ८८ हजार, ६४८ मतांनी विजय झाला. तर उबाठा गटाचे गणेश धात्रक चौथ्या स्थानी राहिले. धात्रक यांना २२ हजार, १२० मते मिळाली. तर तिसर्‍या स्थानावर असलेले अपक्ष उमेदवार रोहन बोरसे यांना २८ हजार, १०८ मते मिळाली. मनमाड शहरासाठी २४ तास पाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने करंजवण धरणातून त्यांनी पाईपलाईन केल्याचा फायदा झाला. सुहास कांदे यांच्या समर्थकांकडून ते ३५ हजाराच्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात कांदे यांना नांदगावच्या जनतेने दुप्पट मताधिक्य देत निवडून दिले.

बागलाणमध्ये दिलीप बोरसेंचा सलग दुसर्‍यांदा विजय

भाजपचा बालेकिल्ला असलेला बागलाण शरद पवार गटाला भेदण्यास पुन्हा एकदा अपयश आले. येथून दिलीप बोरसे यांनी १ लाख, २९ हजार, २९७ मतांनी शरद पवार गटाच्या दिपिका चव्हाण यांचा पराभव केला. दिलीप बोरसे यांना १ लाख, ५९ हजार, ६८१ तर दीपिका चव्हाण यांना फक्त ३० हजार, ३८४ मते मिळाली. दिलीप बोरसे यांनी बागलाणमधील सर्व विक्रम मोडीत काढत सलग दुसर्‍यांदा विजय मिळवला. शहरातून विजयी मिरवणूक काढत फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. सकाळी ८ वाजता लोकनेते पंडित धर्माजी पाटील मराठा इंग्लिश स्कूलच्या आवारात मतमोजणीला प्रारंभ झाला. निवडणुकीच्या रिंगणात भाजप महायुतीचे उमेदवार आ. दिलीप बोरसे, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या दीपिका चव्हाण, प्रहार जनशक्ती पक्षाकडून जयश्री गरूड यांच्यासह १७ उमेदवार रिंगणात होते. पहिल्या फेरी पासूनच दिलीप बोरसे यांनी मतांची आघाडी घेत २१ साव्या फेरी अखेर विक्रमी १ लाख, २९ हजार, ६३८ मतांची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला.