मंगल प्रभात लोढा यांना पडलेल्या मतांची टक्केवारी मुंबईत सर्वाधिक!

    23-Nov-2024
Total Views |

lodha
 
मुंबई : (Mangal Prabhat Lodha) विधानसभा निवडणुकीत मलबार हिल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मंगल प्रभात लोढा यांचा दणदणीत मताधिक्य घेऊन विजय झाला आहे. मलबार हिल विधानसभा क्षेत्रात एकूण १,३७,९११ इतके एकूण मतदान झाले असून, त्यापैकी १,०१,१९७ मते मंगल प्रभात लोढा यांना मिळाली आहेत.
 
एकूण मतदानाच्या ७३.३८% मते मंगल प्रभात लोढा यांना मिळाली असून, मुंबईमध्ये एखाद्या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी सर्वाधिक मतांचा वाटा त्यांनीच मिळवला आहे. ६ वेळा मंगल प्रभात लोढा मलबार हिल मतदारसंघातून निवडून येत असून, २०२४ साली त्यांना सातव्यांदा आमदार म्हणून जनतेने निवडून दिले आहे. या मतदारसंघातून सलग एवढी वर्षे निवडून येणारे मंगल प्रभात लोढा हे प्रथम उमेदवार ठरले आहेत.
 
या विजयाबद्दल आमदार मंगल प्रभात लोढा यांनी जनतेचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. जनतेच्या आशीर्वादामुळे हा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, "मला सातव्यांदा आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाचा मी आभारी आहे. या क्षेत्राचा विकास करण्यासाठी मी वर्षानुवर्षे झटत आलो आहे आणि यापुढे सुद्धा कार्य करत राहीन! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांची प्रेरणा घेऊन, मलबार हिलच्या विकासासाठी नागरिकांना दिलेले वचन पूर्ण करेन!"
 
या विजयानंतर मंगल प्रभात लोढा यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांप्रती सुद्धा आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेकांनी आपला अमूल्य वेळ दिला, घाम गाळला म्हणून, पुन्हा एकदा मला नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळाली, असे त्यांनी यावेळी सांगितले. विजयानंतर लोढा यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला आणि त्यांच्या विजयाचा उत्सव साजरा केला.