यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात मोठ्या पवारांची एकाधिकारशाही महायुतीने मोडीत काढली आहे. पुणे जिल्ह्यातील निकाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देणारे ठरले आहेत. मविआच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा घेऊनदेखील पवारांचा बहुतांश जागांवरील पराभव हा खूप मोठा संदेश देऊन जातो.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात मोठ्या पवारांची एकाधिकारशाही महायुतीने मोडीत काढली आहे. पुणे जिल्ह्यातील निकाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्वेसर्वा नेते शरद पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देणारे ठरले आहेत. मविआच्या जागावाटपात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक जागा घेऊनदेखील पवारांचा बहुतांश जागांवरील पराभव हा खूप मोठा संदेश देऊन जातो. लेकीप्रमाणे नातवाला निवडून आणण्यात अपयश आल्याने, शरद पवारांच्या ‘पॉवर’वर महायुती आणि ‘मोदी मॅजिक’ भारी पडल्याचेच म्हणावे लागेल.
पुणे जिल्ह्यात शरद पवारांची एकाधिकारशाही असल्याचे जे चित्र भासविले जात होते, ते त्यांच्या पुतण्याने अर्थात अजित पवारांनीच या जिल्ह्यातून पुसून काढले आहे. सर्वाधिक जागांवर लढूनदेखील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एकाच जागेवर विजय मिळविता आला. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या अजितदादांच्या उमेदवारांनीच शरद पवारांच्या उमेदवारांना धूळ चारली. त्यामुळे एकूणच पवारांच्या राजकीय व्यूहनीतीचा कोथळा बाहेर निघाल्याचे या निकालांवरून स्पष्ट व्हावे.
पुणे जिल्ह्यातील एकूण २१ विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपने ज्या नऊ जागांवर निवडणूक लढविली, त्या सर्व जागा जिंकल्या असून, शरद पवार गट पाठोपाठ (१३) अजित पवार गटाने या जिल्ह्यात महायुतीत सर्वाधिक ११पवारांवर कुरघोडी करुन आपले वर्चस्व सिद्ध केल्याचे अधोरेखित झाले आहे. तसेच शिंदे गटाने त्यांची एकमेव पुरंदरची लढलेली जागाही जिंकली असून, विजय शिवतारे २४ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
एकूणच महायुतीतील पक्षांचा विजयाचा ‘स्ट्राईक रेट’ पुणे जिल्ह्यात ‘शतप्रतिशत’ राहिला असून, महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षाची मात्र वाताहात झाल्याचे पाहायला मिळाले. कसबा पोटनिवडणुकीतील विजय आणि लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या उन्मादात या पक्षाला जिल्ह्यात जागावाटपात आणि विजयातदेखील आपले स्थान राखता आले नाही. पुणे जिल्ह्यात काँग्रेसच्या चार जागांवर उमेदवार उभे होते. त्यात तीन ठिकाणी तर या पक्षात बंडखोरीदेखील बघायला मिळाली. यात कसब्यामध्ये कमल व्यवहारे, शिवाजीनगरमध्ये मनीष आनंद आणि पर्वतीत आबा बागूल हे काँग्रेसचे बंडखोर रिंगणात होते. या सर्व जागांवर काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. उबाठा गटाने लढविलेल्या दोन जागांपैकी एका जागेवर केवळ विजय मिळविला आहे. अजित पवार गटाने लढविलेल्या ११ जागांपैकी सात जागांवर विजय मिळविला असून, शरद पवार गटाने १३ पैकी केवळ एका जागेवर विजय मिळविला आहे.
विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या मनसेनेदेखील पुणे जिल्ह्यात चार जागांवर नशीब आजमावले होते. मात्र, त्यांना कोठेही यश आले नाही. २०१९सालच्या विधानसभा निवडणुकीतील पुण्यातील एकूण दहा जागांवरील आमदार अजित पवार गटाकडे होते. यंदाच्या निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा काँग्रेसकडून खेचून आणली आहे. भोरमध्ये त्यांचे उमेदवार शंकर मांडेकर हे संग्राम थोपटे यांचा पराभव करून निवडून आले आहेत, तर गतवेळची अजित पवारांकडे असलेली एक जागा शरद पवार गटाने जिंकली आहे. वडगावशेरी मतदारसंघातून यावेळी बापू पठारे यांनी सुनील टिंगरे यांचा पराभव केला आहे. उबाठा गटानेदेखील अजित पवार गटाकडून एक जागा खेचल्याचे दिसत आहे. यात खेडचे दिलीप मोहिते यांचा उबाठाचे बाबाजी काळे यांनी पराभव केला. जिल्ह्यात बंडखोरीचा फटका जुन्नर मतदारसंघात बसल्याचे पाहायला मिळाले. येथे शिंदे गट शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शरद सोनवणे हे अजित पवार गटाचे अतुल बेनके आणि शरद पवार गटाचे सत्यशिल शेरकर यांचा पराभव करून निवडून आले आहेत.
पुणे जिल्ह्यात पक्षफुटीनंतर आता सर्व जागा अजित पवार गटाकडे गेल्या होत्या. दहा आमदार त्यांचे होते, यावेळी सात आहेत. या सातमध्ये अजित पवार गटाने शरद पवार गटाच्या पाच उमेदवारांचा पराभव केला आहे. त्यापाठोपाठ भाजपचे त्यावेळी आठ होते, यावेळी सर्व नऊ जण निवडून आले, तर काँग्रेसचे तीन आमदार होते, यावेळी एकही निवडून आले नाही.
निवडणूकपूर्व काळात महायुतीच्या सरकारने जिल्ह्यासाठी जे विकासाचे निर्णय घेतले आणि केंद्रातील मोदी सरकाने जो भरीव निधी दिला, त्यामुळे आपल्या भागातील परिसराचा विकास होण्यासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेच शिलेदार कार्य करतील, हा विश्वास या भागातील जनतेत निर्माण झाला होता. २०१९ सालच्या निकालाच्या तुलनेत यावेळी महायुतीच्या पक्षांचे बळ वाढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पक्षांतर केलेल्या भाजपमधील हर्षवर्धन पाटील यांना इंदापुरात मतदारांनी नाकारले आहे.
या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे, भाजपचा जिल्ह्यात वाढत चाललेला प्रभाव आणि अजित पवार गटाने शरद पवार गटाला दिलेली जबरदस्त मात! यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असलेल्या शरद पवारांच्या एकाधिकारशाहीला धक्का देणारी ही निवडणूक ठरली आहे. प्रचारात प्रारंभीपासून महायुती आघाडीवर होती. ‘जरांगे फॅक्टर’चा मात्र जिल्ह्यात कोणताही प्रभाव दिसला नाही, हे विशेष. कारण, शरद पवार गटाचे सर्वाधिक उमेदवार असूनदेखील त्यांचा एकच उमेदवार जिल्ह्यात निवडून आला. महत्त्वाचे म्हणजे, ज्या बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने सुप्रिया सुळे यांना निवडून आणले, त्याच मतदारसंघात शरद पवारांचे नातू युगेंद्र पवार पराभूत झाल्याने ही महत्त्वाची राजकीय कलाटणी मानली जाते. एकूणच पुणेकरांनी आपले मत घराणेशाही नाकारत गतिमान विकासाला दिले आहे, हेच निकालावरुन सिद्ध व्हावे.
पक्ष जिंकलेल्या जागा
भाजप ०९
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 08
शिवसेना शिंदे ०१
शिवसेना उबाठा ०१
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ०१
अपक्ष ०१
अतुल तांदळीकर