रायगड जिल्ह्यातील एकूण सात विधानसभा मतदारसंघात विद्यमान सातही विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात होते आणि त्या सातही आमदारांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडली आहे.
रायगड जिल्ह्यातील एकूण सात विधानसभा मतदारसंघात विद्यमान सातही विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात होते आणि त्या सातही आमदारांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडली आहे.
पेण विधानसभा मतदारसंघात रविशेठ पाटील काँग्रेसकडून एकदा, तर भाजपच्या तिकीटावर दुसर्यांदा विजयी होऊन त्यांनी यंदा हॅट्ट्रिक साधली आहे. या मतदारसंघात जनतेला माहीत नसलेले नवखे, बलाढ्य, धनशक्ती असलेले उमेदवार शेतकरी कामगार पक्ष व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्याने रविशेठ पाटील यांच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. शेतकरी कामगार पक्षाचे जुनेजाणते ज्येष्ठ कार्यकर्ते महादू दिवेकर व शिवसेनेचे शिक्षणसम्राट किशोर जैन यांना डावलून जनतेच्या सुखदु:खात सामील होणार्या या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा हिरमोड केला आणि मतदारसंघाबाहेरील उमेदवार लादून महाविकास आघाडीत ‘बिघाडी’ झाली. याचा फायदा भारतीय जनता पक्षाच्या रविशेठ पाटील यांनी उचलून विकासकामांच्या जोरावर ते विजयी झाले.
पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये ‘अपराजित योद्धा’ म्हणून प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विजय संपादन केला. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अपेक्षा व स्वप्नपूर्तीसाठी प्रशांत ठाकूर यांनी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. जिद्द, धाडस, समयसूचकता व आत्मविश्वास याच्या जोरावर सर्व जाती-जमातीतील व सर्व प्रांतीय शहरी मतदारांच्या पाठिंब्याने एकहाती भारतीय जनता पक्षाचे ‘कमळ’ फुलविण्यात ते यंदा यशस्वी ठरले आहेत.
श्रीवर्धन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचे कुटुंब समाजकारण करीत राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. या क्षेत्रात काम करताना सेवाभाव जपत, आपले वडील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल तटकरे यांचा वारसा जबाबदारीने चालवून अल्पसंख्याक मतदारांना आपल्याकडे खेचत अदिती तटकरे यांनी विजयश्री संपादन केली.
रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अहंकारी वृत्तीने आघाडीत बिघाडी होऊन, अलिबागसह रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षासाठी खड्डा खणला आणि त्याच खड्ड्यात आपल्या शिवसेनेला टाकून रायगड जिल्ह्यातील दोन्ही पक्षांचे अस्तित्व संपुष्टात आणले.
आघाडीतील बंडखोरी, अंतर्गत कुरबुरी, शेकाप-शिवसेना यांच्यात असलेला विसंवाद महायुतीच्या विजयासाठी पूरक ठरला. भाजपने दिलेला नारा ‘बटेंगे तो कटेंगे’ याचा अर्थ उद्धव ठाकरे सेना, जयंत पाटील शेतरी कामगार पक्ष यांनी समजूनच घेतला नाही आणि रायगडमध्ये महाविकास आघाडीचे मतविभाजन महायुतीच्या पथ्यावर पडले.
भारतीय जनता पक्ष व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत उद्धव ठाकरेंची शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाला जिल्ह्यात नेतृत्व नव्हते. शेतकरी कामगार पक्षाने जनाधारही गमविला होता. नवयुवक त्या पक्षाकडे आकर्षित होत नव्हते. रायगड जिल्ह्यात तालुकानिहाय नेतृत्व करणारी फळी व सक्षम नावेदेखील या पक्षाकडे नव्हती. श्रीमंत व जनाधार नसलेली नवखी बलाढ्य व्यक्ती कार्यकर्त्यांवर लादून धनशक्तीच्या जोरावर उभे केल्याने धनशक्तीचा कार्यकर्त्यांनी व मतदारांनी पराभव केला. मात्र, शेतकरी कामगार पक्षाने एकाएकी झुंज दिली.
कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर घारे यांनी बंडखोरी केली आणि या बंडखोरीमुळे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यापुढे अडचणींचा डोंगर उभा केला. यामुळे या मतदारसंघात मतमोजणी होताना उत्सुकता वेळोवेळी ताणली जात होती. परंतु, अखेरच्या क्षणी महेंद्र थोरवे यांनी विजय संपादन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कर्जत जिंकून शान राखली.
अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी आपले सासरे माजी आमदार शेतकरी कामगार पक्षाचे लढवय्ये नेते जयंत पाटील यांच्या साथीने गड सर करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो यशस्वी झाला नाही आणि अखेर शेतकरी कामगार पक्षाचे अस्तित्वच रायगड जिल्ह्यातून नेस्तनाबूत झाले.
महाड विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी व राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले यांच्या विरुद्ध स्नेहल जगताप यांनी आयत्या वेळेला उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करून ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ अशी लढाईत रंगत आणली. परंतु, स्नेहल जगताप यांना अपयश येऊन रायगड जिल्ह्यातून उद्धव सेना बाद झाली आणि भरतशेठ गोगावले यांनी शिवसेना शिंदे गटाचा झेंडा कायम फडकवत ठेवला.
उरण मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे प्रितम म्हात्रे या नवोदित युवा नेत्याने आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मनोहर भोईर यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या महेश बालदी यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला.
महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्यात सभाही घेतल्या होत्या. एकूणच त्या सभा यशस्वी ठरल्या, तर शिवसेनेचे आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभा घेतल्या. मात्र, त्या सभा अपयशी ठरल्या आणि एकही उमेदवार विजयी झाला नाही.
रायगडच्या जनतेच्या प्रश्नांना दिलेले प्राधान्य हे महायुतीच्या विजयाचे गमक
आपण कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही श्रीगणेशाने करतो. पेण हे गणेशमूर्ती निर्मितीचे माहेरघर असल्याने गणेशाची उपासना आणि आराधना पेणशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. यामुळे पेणच्या मूर्तिकरांनी काळजी करण्याचे कारण नाही. एवढी वर्षं पेणच्या मूर्तिकारांना अडचणीत येऊ दिले नाही, यापुढेही अडचणीत येऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेणच्या सभेत दिली आणि त्याचा परिणाम हा पेणचा भरघोस विजय आहे. पेणकरांचे प्रश्न भाजप प्राधान्याने सोडवेल.
तसेच जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढविणारा ‘अटल सेतू’ हा चांगल्या प्रगतीचे व गतीचे उदाहरण आहे. याच प्रमाणे ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’च्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या विकासाची गती वाढणार आहे.
महायुतीच्या सरकारने कधीही शेतकर्यांची जमीन कवडीमोल भावाने घेतली नाही आणि ते पुढेही ती तशी कुठे घेणार नाही. शेतकर्यांनी चिंता करू नये, हे सरकार शेतकर्यांसोबत आहे. योग्य दर देऊनच जमीन खरेदी केली जाईल, या स्थानिक प्रश्नांना हात घातला गेल्याने रायगड जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पार्टी व महायुतीला भरघोस मतांनी विजयी केले आहे. त्यामुळे एकूणच विकासाचे गतिमान प्रकल्प आणि शेतकर्यांच्या प्रश्नांची जाण या जोरावरच रायगड जिल्ह्याने महायुतीच्या पारड्यात मतदानाचे भरघोस दान टाकले आहे.
पक्ष जिंकलेल्या जागा
भाजप ०३
शिवसेना (शिंदे) ०३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ०१
आनंद जाधव