मुंबई : हा विजय आमच्यासाठी ऐतिहासिक विजय आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदेंनी दिली आहे. राज्यभरात विधानसभा निवडणूकीची मतमोजणी सुरु असून महायूती बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्रातील तमाम मतदारांचे मनापासून अभिनंदन करतो. या निवडणूकीत महायूतीला मोठ्या मताधिक्याने विजयी केल्याबद्दल मतदारांना धन्यवाद देतो. माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, शेतकरी, जेष्ठ या समाजातील प्रत्येक घटकाने महायूतीला भरभरून मतदान केले. गेल्या अडीच वर्षात महायूतीने केलेल्या कामाची पोचपावती जनतेने दिली आहे."
"महायूतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले. त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात महायूती विजयी झाली. उद्धव ठाकरेंचे अडीच वर्ष आरोप करण्यात गेले. आता तरी लोकांना आरोप पसंत आहेत की, काम हे त्यांना कळायला हवे. आम्ही आरोपांचे उत्तर कामातून दिले. त्यामुळे अडीच वर्षात केलेले काम जनतेने पाहिले आहे. केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करत असताना पटापट काम पुर्ण होतात. आम्हाला प्रत्येक कामात केंद्र सरकारने मदत केली. त्यामुळे हा विजय आमच्यासाठी ऐतिहासिक विजय आहे," असेही ते म्हणाले.