ठाणे : दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचे असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता, सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे त्यात सातत्य ठेवले पाहिजे, तरच तुम्ही पुढे जाल, असा कानमंत्र ठाणे शहर भाजपचे आमदार संजय केळकर ( Sanjay kelkar ) यांनी दिला.
ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट वर्तुळात मानाचे स्थान असणाऱ्या ४८ व्या एन. टी.केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला शुक्रवारी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे सुरुवात झाली. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केळकर बोलत होते. स्टार स्पोर्टस् क्लब, ठाणे महापालिका पुरस्कृत, डोंबिवली क्रिकेट क्लब असोसिएशनच्या सयुक्तपणे आयोजीत केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या राष्ट्रीय महिला क्रिकेटर व मुंबई क्रिकेट असोसिएशन महिला क्रिकेट निवड समिती सदस्य तथा व्यवस्थापक सुषमा मढवी व भारत सरकार एनटीपीसीचे मा.संचालक ,टीजेएसबी बँकेचे विद्याधर वैशंपायन यांच्या हस्ते झाले. यावेळी परिवहन सदस्य विकास पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
केळकर म्हणाले, मी कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ही स्पर्धा सुरू आहे. त्यावेळेला शालिग्राम टूर्नामेंट म्हणून सुरू होती. मात्र कालांतराने ती बंद पडली. म्हणून रणजी प्लेअर, क्रिकेटमधील इतर दिग्गजांना वाटले की ही स्पर्धा सूरु राहिली पाहिजे. येथील खेळाडूंना वाव मिळावा या उद्देशाने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या केलेल्या चर्चेनंतर ही टूर्नामेंट आम्ही पुन्हा सुरू केली. ४८ वर्षांपूर्वी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आणि आज अखंडितपणे सुरू आहे. या टूर्नामेंटचे वैशिष्ट्य असे की, आत्तापर्यंत साडेसातशेहुन अधिक खेळाडू हे राज्यासह इतर राज्यांसाठी तयार झालेले आहेत. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास देखील ही स्पर्धा महत्त्वाची ठरत आहे असेही केळकर म्हणाले. यात महापालिकेचे देखील सहकार्य लाभत आहे. ठाणे जिल्ह्यातील क्रिकेट पुढे गेला पाहिजे खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे हाच प्रमुख उद्देश ही स्पर्धा सुरू करण्यामागचा असल्याचे ते म्हणाले. या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक खेळाडू पुढे गेले आहेत. नवीन खेळाडूंना आवाहन करेन की विकेटवर टिकता आले पाहिजे. दर्जेदार क्रिकेट पुढे आणायचा असेल तर डोक्यात हवा न जाऊ देता सचिन तेंडुलकर यांना आदर्श ठेवून तुम्ही सराव केला पाहिजे तरच तुम्ही पुढे जाल असेही ते म्हणाले.